मुंबई : पवई तलावात उगविलेल्या वनस्पतीमुळे येथील जलप्रदूषण वाढत असून, दुर्गंधीही निर्माण झाली आहे. परिणामी येथील वनस्पती काढण्यासह पवई तलावाला पुनर्जीवित करण्यासाठी पालिका सरसावली आहे. अशा आशयाचा प्रस्तावच महापालिकेच्या स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत मंजूर झाला असून, येथील गणेश विसर्जनाची तयारीदेखील पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने या वेळी देण्यात आली.पवई तलावातील जलपर्णींमुळे तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असून, तलावातील वनस्पती मुळापासून काढण्यासाठी काहीच करण्यात आलेले नाही. मॅकेनिकल कामही झालेले नाही. याबाबत नेमलेल्या समितीचे काय झाले. येथील मगरींचे कारण पुढे करून कामाची किंमत वाढवून घेतली जात आहे. तलावातील गाळ कोणत्या पद्धतीने मोजला, लगतच्या हॉटेल्समधून तलावात सांडपाणी सोडले जात असून, त्यांना नोटीस का बजाविण्यात आली नाही, असे अनेक मुद्दे स्थायी समिती सदस्यांनी बैठकीदरम्यान मांडले.स्थायी समितीच्या सदस्यांच्या या प्रश्नांवर प्रशासनाने असे स्पष्ट केले की, पवई तलावातील वनस्पती काढण्याचा प्रस्ताव असून, यासाठी आयआयटीसोबत समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीद्वारे पवई तलावाचा सर्व्हे झाला आहे. यासंबंधीचे काम एक वर्षात होणार असून, पुढील चार वर्षे झालेल्या कामाची देखभाल केली जाणार आहे. शिवाय पवई तलावाचे काम करण्यासाठी येथे ‘अॅक्सेस पॉइंट्’स असून, कामाचा सर्व्हे आणि किमतीचा मुद्दा गुगलमॅपनुसार निकाली लावण्यात आला आहे.
महापालिका पवई तलाव स्वच्छ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2015 02:10 IST