राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी असलेला आदर आणि त्यांच्यावरील प्रेमापोटी काही कलाकार मंडळी मानधन न घेता रंगभूमीवर सक्रिय होत आहेत. 'होय! मी सावरकर बोलतोय!' या नाटकाच्या कलाकारांनी हा 'अभिजात' प्रयोग केला असून, फेब्रुवारी महिन्यात या नाट्यकृतीचे महाराष्ट्रात ११ प्रयोग करण्याचा संकल्प या चमूने सोडला आहे.
लॉकडाऊनच्या स्थितीनंतर रसिकांनी नाटकाकडे वळावे, या हेतूने विविध प्रकारचे प्रयोग केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून या नाटकाच्या चमूने एकही रुपया मानधन घेता प्रयोग करण्याचे नक्की केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५५व्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून मुंबईची 'अभिजात' ही नाट्य संस्था या प्रयोगांद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना देणार आहे.
मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र या भागात हे ११ प्रयोग होणार आहेत.
ज्येष्ठ कादंबरीकार अनंत ओगले लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील ही नाट्यकृती सुनील जोशी यांनी दिग्दर्शित केली असून, आकाश भडसावळे यांच्या 'अभिजात' नाट्य संस्थेने या नाटकाचे प्रयोग करण्याचा विडा उचलला आहे. 'व्यास क्रिएशन्स' या प्रकाशन संस्थेने त्यांच्या या प्रयत्नांना हातभार लावला आहे. बहार भिडे, साईदेश भगत, सुमित चौधरी, कविता नाईक, प्रसाद संगीत, नरेंद्र कुळकर्णी, आकाश भडसावळे आदी कलावंत यात भूमिका साकारत आहेत.
चौकट:-
महाराष्ट्रभर प्रयोग...
हे नाटक आता ५०व्या प्रयोगाकडे वाटचाल करीत असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानवंदना म्हणून ठाणे, औरंगाबाद, जालना, नाशिक, पनवेल, पुणे, चिंचवड, मिरज, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी हे प्रयोग करणार असल्याची माहिती रंगकर्मी आकाश भडसावळे यांनी याविषयी बोलताना दिली. (ऑपरेटर नोंद : बायलाईन देणे).