Join us

दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘गुणात्मक शाबासकी’

By admin | Updated: April 28, 2017 01:02 IST

शास्त्रीय कला, चित्रकला, वादन, गायन क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षीपासून

प्राची सोनवणे / नवी मुंबईशास्त्रीय कला, चित्रकला, वादन, गायन क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षीपासून दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्यात येणार आहेत. शिक्षण विभागाने पात्र विद्यार्थ्यांकडून ३० एप्रिलपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत. दहावी नियमित व खासगी नियमितच्या ज्या विद्यार्थ्यांनी कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य व लोककलेत सहभाग घेतला आहे, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज मुख्याध्यापकांनी येत्या ३० तारखेच्या आत शिक्षण विभागाकडे पाठवायचे आहेत. राज्यातील एकूण ४८ संस्थांच्या वतीने आयोजित स्पर्धांमध्ये कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य व लोककलेत सहभाग असेल तरच विद्यार्थ्यांना वाढीव गुणाचा फायदा मिळणार आहे. सांस्कृतिक विभागाकडे नोंदणीकृत संस्थेचे दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने प्राप्त केलेले प्रमाणपत्र व उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे अतिरिक्त गुण राज्य मंडळास कळविण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपविण्यात आल्याची माहिती बोर्डाचे विभागीय सचिव सिद्धेश्वर चांदेकर यांनी दिली. या संस्थांची यादी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रसिद्ध केली असून, त्यामध्ये १९ संस्था या शास्त्रीय गायन, नृत्य व वादन यांच्याशी संबंधित आहेत. तर, लोककला प्रकारातील २९ संस्थांचा यादीत समावेश आहे. शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला हे समाजप्रबोधनाचे माध्यम असून, लोककलेची वाढ व संवर्धन करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून क्र ीडा गुणांच्या धर्तीवर सवलतीचे वाढीव गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शास्त्रीय नृत्य, गायन व वादनात मान्यताप्राप्त संस्थेमधून शिक्षण घेतलेल्या व तीन ते पाच वर्षांची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास १० ते १५ गुण देण्यात येणार आहेत. शास्त्रीय नृत्य, गायन, वादन प्रकारात राष्ट्रीय, राज्यस्तरीय शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना २५ गुण मिळणार आहेत. ८वी ते १०वीपर्यंत विद्यार्थ्याने प्रयोगात्मक लोककला प्रकारात ५० प्रयोग केल्यास १० अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत. राज्य सरकारच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या बालनाट्य स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते १५ गुण मिळणार आहेत.