Join us  

शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा, शिक्षक परिषदेची मागणी : शिक्षकांमध्ये संतापाची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 2:17 AM

बूथ लेव्हल आॅफिसर्सची (बीएलओ) कामे स्वीकारा अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करू, अशा धमक्या मतदार नोंदणी अधिका-यांकडून शिक्षकांना दिल्या जात आहेत. या प्रकणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. तसेच शिक्षकांना लावली जाणारी अशैक्षणिक कामे बंद करावीत, अशी मागणी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली.

मुंबई : बूथ लेव्हल आॅफिसर्सची (बीएलओ) कामे स्वीकारा अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करू, अशा धमक्या मतदार नोंदणी अधिका-यांकडून शिक्षकांना दिल्या जात आहेत. या प्रकणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. तसेच शिक्षकांना लावली जाणारी अशैक्षणिक कामे बंद करावीत, अशी मागणी शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली.मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी बीएलओचे काम करण्याबाबत शिक्षकांवर सक्ती केली जात आहे. राज्यातील शिक्षक संकलित मूल्यमापन, पायाभूत चाचणी गुण नोंदणी, नैदानिक चाचणी गुण, विद्यार्थ्यांचे विविध शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे, सरल पोर्टल, शाळासिद्धी, विविध दिन साजरे करण्याबाबतचे अहवाल लिहिणे अशा आॅनलाइन व इतर अशैक्षणिक कामांमुळे शिक्षक बेजार झाले आहेत. शिक्षकांचा शिकविण्यापेक्षा अशैक्षणिक कामात जास्त वेळ वाया जात आहे. तसेच महसूल विभाग, समाजकल्याण, आरोग्य विभाग, निवडणूक आयोगासह अन्य विभागहीशिक्षकांना अशैक्षणिक कामांना जुंपत आहेत, असा आरोप बोरनारे यांनी केला आहे.शालेय शिक्षण सचिवांनी शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाबाबत माहिती नसल्याचे मत प्रसिद्धी माध्यमांकडे व्यक्त केल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. याबाबत अनिल बोरनारे, शिक्षक परिषद मुंबई उत्तर विभागाचे उल्हास वडोदकर, पदाधिकारी सुभाष अंभोरे, बयाजी घेरडे यांनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली होती.याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करून शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाबाबत संबंधित सर्व विभागांच्या मंत्री व सचिवांची बैठक आयोजित करून शिक्षकांची अशैक्षणिककामे कायमची बंद करावीत, अशी मागणी बोरनारे यांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :शिक्षक