मुरुड : यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे खारअंबोली धरणाचा पाणीसाठा मुरुड शहरासह एकदरा, राजपुरी, व शिध्रे या परिसरासाठी केवळ अडीच महिने पुरेल इतकाच उपलब्ध आहे. तेव्हा नागरिकांनी पाण्याच्या वापराबाबत योग्य नियोजन करण्याचे आवाहन तहसिलदार अजय पाटणे यांनी केले आहे.गतवर्षी ५ जुलैपर्यंत १३२७ मिमी पावसाची नोंद होती. तुलनेने या वर्षी फक्त १९९ मीमी पावसाची नोंद असून हे प्रमाण अत्यल्प आहे. गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांना टंचाईसंबंधी पत्र दिले आहे. तसेच तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींनाही पाण्याचे सिलिंग करण्याचे कळविले आहे. साळाव ते तळेखार या पट्ट्यात वेलस्पन कंपनीतर्फे पाणी पुरवठा केला जात आहे. उर्वरित भागात पाणीसाठा १५ दिवसात संपुष्टात येईल असा सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याचे आदेश ग्रामसेवकांना दिले आहेत. तालुक्यात आवश्यकता भासल्यास जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन टँकर सुरु करु असेही पाटणे म्हणाले. (वार्ताहर)
मुरुड शहरासाठी अडीच महिने पुरेल एवढाच पाणीसाठा
By admin | Updated: July 6, 2014 23:48 IST