Join us  

मढ व मालवणीत पाणी टंचाईने नागरिक त्रस्त; लग्नसराईच्या मोसमात होतेय वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 2:52 AM

सध्या पालिकेच्या १० टक्के पाणीकपातीमुळे व लग्नसराईच्या मोसमाने पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण करावी लागत आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : ‘नेमेची मग येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे मढ, मालवणी या भागात पाणीटंचाई असते. वाढती लोकसंख्या, गरजेपेक्षा पाण्याचा कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, उंच टोकाला पाणी पोहोचण्यासाठी साधनांचा अभाव, जीर्ण झालेल्या व जर पाण्याचा दाब वाढवला तर फुटणाऱ्या जलवाहिन्या या विविध कारणांमुळे मढ, आंबोज वाडी, मालवणी व या भागांच्या आजूबाजूच्या भागात पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना सातत्याने करावा लागत आहे. पाणीटंचाईमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. सध्या पालिकेच्या १० टक्के पाणीकपातीमुळे व लग्नसराईच्या मोसमाने पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण करावी लागत आहे.मढ जेट्टी येथील कोकण नगर, साई नगर, ख्रिश्चन लेन येथील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. मढला सायंकाळी ६ ते ८ व मध्यरात्री १२ ते १.३० या वेळेत पाणीपुरवठा होतो. मात्र पाण्याचा दाब कमी असतो. तर आंबोजवाडी येथे पाण्याची जलवाहिनी नसल्याने येथील सुमारे २०,००० नागरिकांना पायी १ किमी अंतरावरून पाणी आणावे लागते, अशी माहिती काँग्रेसचे ब्लॉक क्र मांक ४९ चे अध्यक्ष अ‍ॅड. विक्रम कूपर यांनी ‘लोकमत’ला दिली. मढ विभागातील पाणी समस्येवर बोलताना मच्छीमार नेते किरण कोळी म्हणाले, येथील धारवली (आक्सा), डोंगर पाडा-धारवली, मढ कोळीवाडा, पातवाडी, धोंडीगांव, पास्कोल वाडी, टोकारा इत्यादी ठिकाणी त्रिवार पाणीटंचाई आहे. मागील वर्षी शिवसेनेच्या प्रभाग क्र मांक ४९ च्या स्थानिक नगरसेविका संगीता संजय सुतार व स्थानिक शिवसैनिकांनी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेतली असता. त्यांनी संबंधित जल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा रात्रीचे १२ ते २ वाजेपर्यंत दुसºया सत्रात पाणी सुरू केले. परंतु आता तेदेखील बंद झालेले आहे. गेले दहा-पंधरा दिवस नगरसेविका संगीता सुतार व शिवसैनिक पाठपुरावा करीत आहेत. तसेच यापूर्वी दहीसर-बोरीवली टर्मिनलवरून पाणी येत होते.नगरसेविका सुतार यांच्या प्रयत्नाने मढ विभागाकरिता रॉयन स्कूलपासून मिटचौकी मार्गे फायरब्रिगेड मालवणीपर्यंत ३६ इंचाची व अंबोजवाडी, बाबरेकर नगर व म्हाडाकरिता रॉयन स्कूलपासून मिटचौकी खाडीवर ब्रिज टाकून त्यावर ३६ इंचाची जलवाहिनी सुरू केली आहे़ पाण्याच्या जलवाहिन्या फुटतात, हे आमचे दुर्दैव, अशी खंत किरण कोळी यांनी शेवटी व्यक्त केली.‘दूषित पाण्याचा प्रश्न मिटेल’पी उत्तर विभागाचे साहाय्यक जलाभियंता संतोष संख्ये म्हणाले की, लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याने आता पालिकेतर्फे येथील ५.५० किमी भागात ४, ६, ९, १२ व १८ इंच नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सदर काम पूर्ण झाल्यावर येथील नागरिकांना पाणी मिळेल. मात्र येथील नागरिकांची गैरसोय होऊनये म्हणून पालिकेतर्फे रोज २ ते ३ टँकर पाणीपुरवठा करण्यात येतो़ मालवणी एमएचबी कॉलनीला गढूळ पाणीपुरवठा होतो अशी तक्र ार आहे. जलवाहिनी टाकण्यास सुरुवात झाली असल्याने दूषित पाणी पुरवठ्याची तक्र ार मिटेल़

टॅग्स :पाणी