Join us

जीव मुठीत घेऊन नागरिकांचे वर्षानुवर्षे धोकादायक इमारतीत वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील काही वर्षांत मुंबईचा कायापालट झाला असला तरीदेखील मुंबईतील जुन्या व जीर्ण इमारतींचा प्रश्न ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील काही वर्षांत मुंबईचा कायापालट झाला असला तरीदेखील मुंबईतील जुन्या व जीर्ण इमारतींचा प्रश्न आजही तसाच आहे. वर्षानुवर्षे न्याय न मिळाल्याने आजही मुंबईतील हजारो कुटुंबे जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतीत वास्तव्य करीत आहेत. एखादी इमारत कोसळून जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न मुंबईकर उपस्थित करीत आहेत.

चुनाभट्टीच्या टाटानगर येथील ७० वर्षे जुनी इमारत पूर्णतः जीर्ण झाली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही इमारत चुनाभट्टीच्या स्वदेशी मिलमधील कामगारांसाठी ७० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. २००० साली स्वदेशी मिल बंद पडली. तेव्हापासून या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. ही इमारत धोकादायक असल्याने महानगरपालिका रहिवाशांना घरे रिकामी करायला सांगत आहे; परंतु घरभाडे परवडत नसल्याने व एकदा घर सोडून गेलो, तर पुन्हा या जागी नवीन घर मिळेल की नाही, याची शाश्वती नसल्याने नागरिक घर सोडून जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे अजूनही १२३ कुटुंबे रोज जीव मुठीत घेऊन या इमारतीत वास्तव्य करीत आहेत.

या इमारतीतील रहिवासी महिंद्रा पाल बजाज यांनी सांगितले की, कामगारांना मिलकडून अद्यापही देणी येणे बाकी आहे. मिल बंद पडल्यापासून कामगारांच्या हाताला काम नाही. त्यात आजूबाजूच्या परिसरातील घरभाडे गगनाला भिडले आहे. प्रशासनही आम्हाला राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था देत नाही. मग आम्ही घर सोडून जायचे तरी कुठे? जोरात पाऊस पडायला लागल्यावर भीतीचे वातावरण निर्माण होते. अनेकदा घरात स्लॅबची पडझड होते. या इमारतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने कोणीच लक्ष देत नाही. मात्र, शासनाने या इमारतीचा तातडीने पुनर्विकास करणे गरजेचे आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते.

अशीच काहीशी परिस्थिती भायखळा येथील हँकॉक पुलाशेजारी असणाऱ्या थोवर मेंशन या इमारतीची आहे. ही म्हाडाची इमारत मागील अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. ही इमारत पुनर्विकासासाठी एका खासगी विकासकाने आपल्या ताब्यात घेतली आहे; परंतु कित्येक वर्षे उलटली तरीही रहिवासी या इमारतीच्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेतच आहेत. पालिकेतर्फे या इमारतीच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा नोटीस येऊन गेली आहे. मात्र, विकासक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवासी करीत आहेत. इमारत दुरुस्त न केल्यामुळे अनेकदा इमारतीत स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.

* फोटो ओळ : चुनाभट्टीच्या जीर्ण झालेल्या टाटानगर इमारतीची चारही बाजूंनी झालेली पडझड.

-----------------------------------------------