Join us

सिमेंट कारखान्याविरोधात नागरिकांचा एल्गार

By admin | Updated: July 6, 2015 06:19 IST

मालाड (प) मालवणी येथील खारोडी गावातील दारूकांडाचे प्रकरण ताजे असतानाच खारोडी येथील नागरी वस्तीतील सिमेंट कारखान्याच्या विरोधात नागरिकांनी एकत्र येऊन एल्गार पुकारला आहे.

मुंबई : मालाड (प) मालवणी येथील खारोडी गावातील दारूकांडाचे प्रकरण ताजे असतानाच खारोडी येथील नागरी वस्तीतील सिमेंट कारखान्याच्या विरोधात नागरिकांनी एकत्र येऊन एल्गार पुकारला आहे. सेव्ह अवर लँड (सोल), मार्वे रोड रेसिडन्टस असोसिएशन आणि वॉच डॉग फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी १० वाजता परिसरातील तीन सिमेंट कंपन्यांच्या कारखान्यांवर सुमारे १,५०० नागरिकांनी धडक मोर्चा नेला. हे तिन्ही सिमेंट कारखाने येथील नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरत असल्यामुळे ते तातडीने बंद करण्याची मागणी या नागरिकांनी केली. येथील नागरिकांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर सायन येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारखान्यावर ‘आरोग्य वाचवा-सिमेंटचे कारखाने बंद करा’ या मागणीसाठी शाळकरी मुलांचा धडक मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती वॉच डॉग फाउंडेशनचे ग्रॉडफे पिमेंटा आणि निकोलस अल्मेडा यांनी दिली.गेल्या एक वर्षापासून येथील मार्वे रोड, जनकल्याण नगर, राठोडी गांव, खारोडी गांव, भूमी पार्क, बफ्हिरा नगर येथील नागरिक एकत्र येऊन हे सिमेंटचे कारखाने बंद करण्यासाठी लढा देत आहेत. हे सिमेंटचे धोकादायक कारखाने बंद करण्यासाठी येथील पालिकेचा पी (उत्तर) विभाग, साहाय्यक पालिका आयुक्त, नगरसेवक, आमदार-खासदार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र नागरिकांच्या या मागणीला त्यांनी केराची टोपली दाखवल्याचे डिसोझा यांनी सांगितले. येथील नागरिकांच्या रेट्यामुळे नुकतीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या तीन सिमेंट कारखान्यांना सात दिवसांची कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती ग्रॉडफे पिमेंटा यांनी दिली. (प्रतिनिधी)> या कारखान्यांच्या होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे येथील अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार, दमा, खोकला यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच हे कारखाने येथील तिवरांच्या जंगलाजवळ असल्याने येथील तिवरांचे जंगल नष्ट होत आहे. त्याचा पर्यावरणावरदेखील मोठा परिणाम होत असल्याची माहिती सोलचे डॉल्फी ए. डिसोझा आणि पिमेंटा यांनी दिली.