Join us  

सीआयएससीईचे दहावी-बारावीचे निकाल जाहीर, टॉपर्सची यादी यंदा नाही

By रेश्मा शिवडेकर | Published: May 06, 2024 4:52 PM

दहावीचा ९९.४७ टक्के तर बारावीचा ९८.१९ टक्के निकाल. 

रेश्मा शिवडेकर, मुंबई : विद्यार्थ्यांमधील गुणांच्या स्पर्धेला फाटा देत टॉपर्सची नावे जाहीर करण्याचे टाळून कौन्सिल फॉर दि इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता घेतलेल्या दहावी-बारावी परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर केला. मंडळाचा दहावीचा निकाल ९९.४७ टक्के इतका लागला आहे. तर बारावी परीक्षेचा निकाल ९८.१९ टक्के लागला आहे. दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेला देशभरातून बसलेल्या २,४३,६१७ विद्यार्थ्यांपैकी २,४२,३२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला १,१३,१११ मुली बसल्या होत्या. त्यापैकी १,१२,७१६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण ९९.६५ टक्के आहे. तर १,३०,५०६ मुलांपैकी १,२९,६१२ मुलगे उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ९९.३१ टक्के इतके आहे. मुलींची कामगिरी मुलांच्या तुलनेत चांगली राहिली. बारावीच्या (आएससी) परीक्षेला देशभरातून ९९,९०१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ९८,०८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला बसलेल्या ४७,१३६ विद्यार्थिनींपैकी ४६,६२६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. हे प्रमाण ९८.९२ टक्के आहे. तर ५२,७६५ विद्यार्थ्यांपैकी ५१,४६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण ९७.५३ टक्के आहे.

निकाल सुधारण्याची संधी-

विद्यार्थ्यांना गुणांविषयी शंका असल्यास पेपर रिचेकिंग आणि रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करता येईल. त्याकरिता एक ते दीड हजार रूपये शुल्क आकारले जाईल. विद्यार्थ्यांना कमीत कमी दोन विषयांना पुन्हा बसून आपला निकाल सुधारता येईल. या परीक्षांचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.

दहावीचा विभागनिहाय निकाल-

उत्तर – ९८.०१ टक्केपूर्व – ९९.२४ टक्केपश्चिम – ९९.९१ टक्केदक्षिण – ९९.८८ टक्केपरदेशी – ९३.५४ टक्के

बारावीचा विभागनिहाय निकाल-

उत्तर – ९८.०१ टक्केपूर्व – ९७.८४ टक्केपश्चिम – ९९.३२ टक्केदक्षिण – ९९.५३ टक्केपरदेशी – ९९.४७ टक्के

दहावीची परीक्षा दिलेल्या अनुसूचित जातीच्या (एससी) १५,०२५ विद्यार्थ्यांपैकी ९९.११ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. अनुसूचित जमातीच्या (एसटी) ८,२५५ विद्यार्थ्यांपैकी ९८.३९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ओबीसीतील ५६,८०३ विद्यार्थांपैकी ९९.५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बारावीची परीक्षा दिलेल्या अनुसूचित जातीच्या (एससी) ५,१९४ विद्यार्थ्यांपैकी ९७.७१ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. अनुसूचित जमातीच्या (एसटी) ३,६०० विद्यार्थ्यांपैकी ९६.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ओबीसीतील १७,०७४ विद्यार्थांपैकी ९८.२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

टॅग्स :मुंबईशिक्षण