अलिबाग : सरकारी रुग्णालयात सिटीस्कॅन मशिन तातडीने उपलब्ध करून देऊन सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय टाळावी, अशी मागणी अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकांत भगत यांनी केली. याबाबतचे निवेदन मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांना देण्यात आले आहे. त्यानुसार माणगाव येथील सिटीस्कॅन मशिन अलिबागला आणण्यासाठी सरकारची परवानगी घेण्यात येईल, असे त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.अलिबाग येथील मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या सरकारी रुग्णालयात रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने रुग्ण येतात. त्याचप्रमाणे गंभीर अपघात झालेले रुग्णही मोठ्या संख्येने येथे येत असतात. योग्य निदान होण्यासाठी येथे सिटीस्कॅन मशिन बसविण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याच अपघातग्रस्त रुग्णांना त्याचा फायदा होत होता. मात्र सरकारच्या धोरणामुळे सर्व जिल्ह्यांमधील सिटीस्कॅन मशिन जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अलिबाग येथील सिटीस्कॅन मशिनही माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आली आहे.अलिबाग येथे ही सुविधा नसल्याने येणाऱ्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पेण-वडखळ अथवा पनवेल येथे रुग्णांना सिटीस्कॅन करण्यासाठी जावे लागत आहे. त्यामध्ये रुग्णांना आर्थिक फटका बसत असून वेळही खर्च होत आहे. गरीब रुग्णांना हा खर्च अजिबात परवडणारा नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होत असल्याचे अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ऋषिकांत भगत यांनी निवेदनात नमूद केले आहे. गरीबांची या त्रासातून सुटका करण्यासाठी सरकारला अहवाल पाठवावा. माणगाव येथील सिटीस्कॅन मशिन पुन्हा अलिबागला आणावे, अशी मागणी भगत यांनी केली. माणगावमध्ये सिटीस्कॅनसाठी तंत्रज्ञही नसल्याचे समोर येत आहे. (प्रतिनिधी)
सिटीस्कॅन मशिन पुन्हा अलिबागला आणणार
By admin | Updated: May 12, 2015 22:49 IST