नवी मुंबई : पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभारावर सिडकोने भर दिला आहे. त्यादृष्टीने विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबविले जात आहेत. असे असले तरी शहरात वाढत जाणाऱ्या अतिक्रमणांवरील कारवाईबाबत मात्र सिडकोकडून सारवासारव केली जात असल्याचे दिसून आले आहे.सिडकोच्या दक्षता विभागाच्या वेब लिंकचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. यावेळी पत्रकारांनी अतिक्रमणांवर व्यवस्थित कारवाई होत नसल्याची तक्रार भाटिया यांच्याकडे केली. भूमाफियांना जरब बसविण्यासाठी पहिल्या टप्प्यात बड्या मंडळींच्या निवडक चाळीस बांधकामांवर कारवाई करण्याचे सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. मात्र महिना उलटा तरी तशा प्रकारची कोणतीही कारवाई झाली नसल्याचे पत्रकारांनी भाटिया यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र अतिक्रमणांच्या विरोधात सिडकोची मोहीम सुरळीत सुरू असून मागील महिनाभरात अनेक बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करून भाटिया यांनी या मुद्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)
अतिक्रमणांवरून सिडकोची सारवासारव
By admin | Updated: January 16, 2015 03:21 IST