कमलाकर कांबळे ल्ल नवी मुंबईपारदर्शक व गतिमान कारभारासाठी सिडकोने आता ई-आॅफीस प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिस्टीम अॅटोमेशन प्रोशसवर (सॅप) या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार असून, याबाबतच्या निविदाही मागविण्यात आल्या आहेत. साधारण वर्षभरात संपूर्ण कारभार पेपरलेस करण्यात येणार आहे.भ्रष्टाचारामुळे डागाळलेली सिडकोची प्रतिमा पुसून काढण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी कंबर कसली आहे. विविध कामांसाठी सिडकोत येणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर व्हावी. अधिकाऱ्यांचाही ताण कमी व्हावा, या उद्देशाने सिडकोचा सर्वच कारभार ई आॅफीस अर्थात पेपरलेस करण्याचा निर्णय भाटीया यांनी घेतला आहे. त्यानुसार सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना आपापल्या विभागाच्या कामाचा तपशील तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यासाठी आवश्यजक सॅप प्रणालीसाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. साधारण वर्षभरात टप्प्याटप्प्याने सिडकोत पेपरलेस कामकाज सुरू होईल, असा विश्वास भाटीया यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. स्कॅनिंगसाठी निविदा : ई आॅफीस अर्थात पेपरलेस कारभारासाठी विविध विभागांतील जुन्या फाइल्स, कागदपत्रांचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. जवळपास ७0 लाख फाइल्सचे स्कॅनिंग करावे लागणार आहे. ही प्रक्रिया समांतर चालणारी असून, त्यासाठी सुध्दा निविदा मागविण्यात येणार आहेत.
सिडकोची ई-आॅफीस प्रणाली
By admin | Updated: January 18, 2015 00:05 IST