नवी मुंबई : कायमस्वरूपी नोकर भरतीला राज्य शासनाची मंजुरी मिळविण्यास सिडको प्रशासनास अपयश आल्याने सिडकोत विविध संवर्गांतील सुमारे १२३० पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी वर्गावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.सिडको महामंडळात सुरुवातीच्या काळात २६४० अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या होती. मात्र मागील चाळीस वर्षांत यापैकी अनेक कर्मचारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांची ही संख्या निम्म्यावर आली आहे. याउलट सिडकोच्या कामाचा पसारा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा अतिरिक्त ताण विद्यमान कर्मचाऱ्यांवर पडत आहे. सिडको कर्मचारी युनियनतर्फे अलीकडेच कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बहुतांशी कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे याद्वारे निष्पन्न झाले होते. सिडकोत सध्या रोजंदारीवर २५० कर्मचारी, आरोग्य विभागात ११५ तर सफाई कामासाठी ठेकेदारी पद्धतीवर १३२१ कर्मचारी काम करीत आहेत. त्यामुळे रिक्त असलेल्या १२३0 कायमस्वरूपी पदांच्या नोकर भरतीसाठी परवानगी मिळावी यासाठी सिडकोचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नसल्याने सिडकोने शासनाच्या अन्य प्राधिकरणांतून निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगारावर सल्लागार या संज्ञेखाली आपल्या सेवेत सामावून घेण्याचा सपाटा लावला आहे. सिडको प्रशासनाच्या या भूमिकेस कर्मचारी संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे.
रिक्त पदे भरण्यास सिडकोला अपयश
By admin | Updated: June 4, 2015 05:17 IST