नवी मुंबई : करारातील अटी व नियमांच्या अधीन राहून प्रकल्पग्रस्त आणि गरीब रूग्णांसाठी दहा टक्के खाटा राखीव ठेवण्याचे निर्देश सिडकोने शहरातील खासगी रूग्णालय चालकांना दिले होते. मात्र बहुतांशी रूग्णालयांकडून या निर्देशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे. सिडकोने याची गंभीर दखल घेतली असून प्रवेशद्वारांवर नियमानुसार राखीव खाटांचा दैनंदिन तपशील प्रदर्शित करण्याच्या सूचना संबंधित हॉस्पिटल चालकांना दिल्या आहेत.
खासगी रूग्णालयासाठी सिडकोने सवलतीच्या दरात भूखंड दिले आहेत. संबंधित संस्था चालकांनी त्या भूखंडांवर मेडिकल कॉलेज तसेच रूग्णालये उभारली आहेत.भूखंड देताना सिडकोबरोबरच्या कारारनाम्यात प्रकल्पग्रस्त व गरीब रूग्णांसाठी या रूग्णालयांत दहा टक्के खाटा आरक्षित करण्याची अट घालण्यात आली होती. सुरूवातीच्या काळात या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबत अनुकूलता दर्शविणा:या बहुतांशी खासगी रूग्णालय चालकांनी कालांतराने या नियमाला फाटा दिल्याचे सिडकोच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी चार महिन्यांपूर्वी शहरातील हॉस्पिटल संचालकांची एक बैठक घेवून या नियमांची आठवण करून दिली होती. करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार प्रत्येक रूग्णालय चालकांनी प्रकल्पग्रस्त व गरीब रूग्णांसाठी दहा टक्के खाटा आरक्षित ठेवाव्यात. तसेच या आरक्षित खाटांचा दैनंदिन तपशील रूग्णालयाच्या प्रवेशद्वारांवर प्रदर्शित करावा. त्याचप्रमाणो हा तपशील रूग्णालयांच्या संकेतस्थळावरही अपलोड करावा, अशा सूचना भाटिया यांनी या बैठकीत रूग्णालय चालकांना दिल्या होत्या. मात्र शहरातील अनेक रूग्णालय चालकांकडून आजही या नियमाचे पालन होत नसल्याचे दिसून आले. गेल्या महिन्यात झालेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान एका जखमी गोविंदाला उपचार नाकारणा:या नेरूळ येथील तेरणा हॉस्पिटलला सिडकोने नोटीस बजावली होती. या पाश्र्वभूमीवर नियमानुसार दहा टक्के खाटा आरक्षित ठेवून त्याचा दैनंदिन तपशील प्रवेशद्वार व संकेतस्थळावर प्रदर्शित न करणा:या रूग्णालयांना नोटिसा बजावण्यात येतील, असे सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्तांना आरक्षण
करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार प्रत्येक रूग्णालय चालकांनी प्रकल्पग्रस्त व गरीब रूग्णांसाठी दहा टक्के खाटा आरक्षित ठेवाव्यात. तसेच या आरक्षित खाटांचा दैनंदिन तपशील रूग्णालयाच्या प्रवेशद्वारांवर प्रदर्शित करावा. त्याचप्रमाणो हा तपशील रूग्णालयांच्या संकेतस्थळावरही अपलोड करावा, अशा सूचना सिडकोने दिल्या आहेत.