Join us

सिडकोचे भूखंड महागले

By admin | Updated: June 30, 2015 01:19 IST

सिडकोने शहरातील भूखंडांच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. सिडको दरवर्षी प्रत्येक नोडसाठी भूखंडांच्या राखीव किमती निश्चित करते. त्यानुसार १३ नोड्स

नवी मुंबई : सिडकोने शहरातील भूखंडांच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. सिडको दरवर्षी प्रत्येक नोडसाठी भूखंडांच्या राखीव किमती निश्चित करते. त्यानुसार १३ नोड्स आणि नोड्सविरहित क्षेत्रातील राखीव किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार वाशी नोडमधील भूखंडांसाठी सर्वाधिक दर निश्चित करण्यात आले आहेत.सिडकोने भूखंडांच्या आधारभूत किमतीबाबतचे धोरण १९९८ मध्ये आखले होते. त्यात २००० ते २००३ मध्ये किरकोळ सुधारणा करण्यात आल्या. गेल्या आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यात आणखी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्रचलित धोरणानुसार राखीव किमतीत २५० टक्के वाढ करून म्हणजेच २.५ पट वाढ करून आधारभूत किंमत निश्चित केली जाते. ही आधारभूत किंमत सिडको विक्रीस काढत असलेल्या भूखंडांच्या निविदेमध्ये नमूद केलेली असते. निविदेला मिळालेल्या प्रतिसादात विकासक आधारभूत किमतीच्या दुप्पट ते तिप्पट भाव कोट करतात. यात केलेल्या बदलानुसार राखीव किमतीत आता ३०० टक्के म्हणजेच तिप्पट वाढ करण्यात आली आहे. द्रोणागिरी आणि उलवे या विकसनशील नोडसह, नोडविरहित क्षेत्रातील निवासी भूखंडांच्या आधारभूत किमतीत २५ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. प्रचलित आधारभूत किंमत धोरणात या क्षेत्रातील आरक्षित किमतीत २०० टक्के वाढ करण्यात येत होती. आता त्यात २५० टक्के वाढ करण्यात आली आहे. उलवे नोडमधील राखीव किंमत प्रति चौ.मी.ला ४,९५० रु. एवढी असून तिची दुप्पट किंमत ९,९०० रु. एवढी होते. अडीचपट (२५० टक्के) वाढ करण्यात आल्यामुळे आता आधारभूत किंमत १२,३७५ रु. एवढी होईल. तुलनेने यात केवळ २५ टक्के वाढ होईल. ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, सानपाडा, नेरूळ, बेलापूर, खारघर, नवीन पनवेल, कळंबोली आणि जुई-कामोठे या नोडमधील निवासी भूखंडांच्या आधारभूत किमतीत केवळ २० टक्के वाढ करण्यात आली आहे. (वार्ताहर)नोडनुसार किमती ऐरोली - ७५०० रु. (प्रति चौरस मीटर) , घणसोली-६५०० रु. , कोपरखैरणे-८७३५ रु., वाशी-१२,७६० रु., सानपाडा-१०,६५० रु., नेरूळ-१०,९६० रु., बेलापूर-७,६८० रु., खारघर-७,६८०रु., नवीन पनवेल-७१००रु., कळंबोली-५४००रु., जुई-कामोठे-५४००रु., द्रोणागिरी-५५८०रु., उलवे-४९५०रु. तर नोडविरहित क्षेत्र-६४००रु. याप्रमाणे आहे. हे दर सिडकोच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.