Join us

अतिक्रमणावर सिडकोचा हातोडा

By admin | Updated: August 13, 2015 00:38 IST

सिडकोने हाती घेतलेल्या पहिल्या टप्प्यातील अनधिकृत बांधकाम तोडक मोहिमेला बुधवारी खारघर सेक्टर १९ मध्ये मुर्बी गावातून सुरुवात झाली. भूखंड क्रमांंक १४० वर दत्तू जानू ठाकूर या प्रकल्पग्रस्ताने

पनवेल : सिडकोने हाती घेतलेल्या पहिल्या टप्प्यातील अनधिकृत बांधकाम तोडक मोहिमेला बुधवारी खारघर सेक्टर १९ मध्ये मुर्बी गावातून सुरुवात झाली. भूखंड क्रमांंक १४० वर दत्तू जानू ठाकूर या प्रकल्पग्रस्ताने बांधलेली तळमजला व चार मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. मुर्बी गावात करण्यात आलेले हे बांधकाम २०० मीटरच्या आत व गरजेपोटी असून सिडकोमध्ये संबंधित शेतकऱ्याची पात्रता शिल्लक असल्यामुळे सिडकोने सुरू केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळी शेकाप नेते बाळाराम पाटील यांनी केला. कारवाईला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष वासुदेव घरत यांच्यासह शेकडो ग्रामस्थ कारवाईच्या ठिकाणी जमले होते. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. ही कारवाई थांबविण्यात यावी, अशी विनंती महिला ग्रामस्थांनी केली. मात्र सिडकोने तोडकाम सुरू करताच ग्रामस्थांचा संताप झाला. अतिक्रमण विरोधातील कारवाईला विरोध करणाऱ्या बाळाराम पाटील यांना खारघर पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासह खारघर ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ गायकर, संजय घरत, विश्वनाथ चौधरी, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव घरत यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.सिडको क्षेत्रातील २० हजार गरजेपोटी घरांना नियमित केले जाईल, असा निर्णय शासनाने घेतलेला आहे. मात्र सिडकोने ही २० हजार घरे कोणती, याबद्दल माहिती जाहीर केली नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रम आहे. सिडकोने यापूर्वीच हाती घेतलेल्या कारवाईविरोधात प्रकल्पग्रस्तांनी जोरदार मोर्चा काढत सिडकोवर धडक दिली होती. याचा धसका घेत सिडकोने तोडक मोहीम थांबविली होती व २०० मीटरची हद्द निश्चित केल्याशिवाय कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन खुद्द सिडकोचे व्यवस्थापकीय संंचालक संजय भाटिया यांनी दिले होते. तरी देखील सिडकोने मुर्बी गावात घरावर हातोडा फिरविल्याने ग्रामस्थ आणखीनच गंभीर झाले आहेत. वातावरण तंग मुर्बी येथील इमारतीवर कारवाई होत असल्याचे कळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ याठिकाणी एकवटले. सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईस सुरुवात करताच सर्वांनी विरोध केला. त्यावेळी काही काळ वातावरण तंग झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. वयोवृध्द महिला जखमीनीराबाई ठाकूर या वयोवृध्द महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मोठ्या हायड्रा मशिनच्या सहाय्याने सिडकोने चार मजली इमारत जमीनदोस्त केली. यावेळी खारघर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता.200मीटरपर्यंत बांधलेल्या गरजेपोटी बांधकामांना दिलासा देण्याचे धोरण अवलंबले असताना सिडकोने सुरू केलेली ही कारवाई अन्यायकारक आहे. कारवाईविरोधात खारघरमध्ये आम्ही आंदोलन करणार असून ज्या ज्या ठिकाणी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई केली जाईल, त्याठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र येवून विरोध करणार आहोत.- बाळाराम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस