Join us

भ्रष्टाचाराच्या विरोधात सिडको आक्रमक

By admin | Updated: January 16, 2015 03:24 IST

सिडकोने भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मागील दीड वर्षात विविध उपक्रम राबविले आहेत

नवी मुंबई : सिडकोने भ्रष्टाचाराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मागील दीड वर्षात विविध उपक्रम राबविले आहेत. आता त्याही पुढे जात भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारींवर पारदर्शकपणे निर्णय घेता यावा, यासाठी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर दक्षता विभागाच्या वेब लिंकची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या हस्ते आज या वेब लिंकचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाला आमदार मंदा म्हात्रे, सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा आणि सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे उपस्थित होत्या. सिडकोने कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी २० कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवले आहेत. भ्रष्टाचाराबाबत जनजागृती करणे हा मुख्य हेतू असल्याचे संजय भाटिया यांनी स्पष्ट केले. ‘सिडको आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. सध्या सिडकोच्या पाच लाख फाईल्सच्या डिजिटायझेशनचे काम सुरू आहे. अनेक प्रकल्प प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी घेऊन विकसित केले जात आहेत. प्रकल्पग्रस्तांशी वेळोवेळी संवाद साधणे आवश्यक आहे,’ असे मत सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी व्यक्त केले. ‘कोणतीही कामे वेळेत झाली, कामांना वेग आला आणि प्रत्येक कामाचा जर योग्य पाठपुरावा झाला तर भ्रष्टाचार आपोआप थांबेल. कामे रखडली की भ्रष्टाचार होतो अशी सर्वसामान्य जनतेची धारणा आहे. त्यामुळे नियोजित कामांचा वेळेत निपटारा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा,’ अशी सूचना आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी केली. ‘सिडकोच्या दक्षता विभागाने भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सुरू केलेल्या वेबलिंकच्या माध्यमातून सामान्य नागरिकांनी नोंदवलेली तक्रार थेट मुख्य दक्षता अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. ही तक्रार सर्वांनाच दिसणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल,’ असा विश्वास मुख्य दक्षता अधिकारी डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)