Join us  

पेपर फुटी प्रकरणाची सीआयडी चौकशी करणार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 4:19 PM

अमरावती विद्यापीठातील खासगी कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या संगनमताने अभियांत्रिकी मेकॅनिक्स विषयाचा पेपर फुटल्याचे वडेट्टीवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

मुंबई : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील पेपर फुटी प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच येत्या दोन महिन्यांमध्ये त्याचा अहवाल पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिले. विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेवट्टीवार यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. 

अमरावती विद्यापीठातील खासगी कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या संगनमताने अभियांत्रिकी मेकॅनिक्स विषयाचा पेपर फुटल्याचे वडेट्टीवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. परीक्षा विभागातील स्पायरल बाफॅड या कंपनीच्या अंतर्गत काम करणार्‍या खाजगी कर्मचार्‍यांमाफॅत वाशिम येथील संमती अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावरुन पेपर फुटल्याची माहिती सभागृहाला दिली. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीआयडीला देणार का? किती वेळात ही चौकशी पुर्ण करणार? ज्या महाविद्यालयात पेपर फुटला त्या प्राचार्यांवर कारवाई करणार का? असे प्रश्‍न उपस्थित केले. 

या घटनेची विद्यापीठातून परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक यांनी प्राथमिक चौकशी अहवाल तयार करुन तो अहवाल विद्यापीठांच्या कुलगुरूंना सादरही केला. या प्रथामिक अहवालाची सखोल चौकशी करण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी डॉ.एफ.सी. रघुवंशी, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीही गठीत केली होती. या समितीने आपला अहवाल समितीच्या अध्यक्षांनी कुलगुरूंना 7 जुन 2019 रोजी सादर केला. या समितीच्या अहवालानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची, माहिती राज्यमंत्री वायकर यांनी सभागृहाला दिली. परंतु, सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात येईल, त्याचा अहवाल दोन महिन्यांमध्ये सादर करण्यात येईल. तसेच ज्या कॉलेजांमध्ये पेपर फुटला त्यात प्राचार्य दोषी आढळल्यास त्यावरही कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन राज्यमंत्री वायकर यांनी दिले. विधानसभा सदस्य सुनिल देशमुख यांनी प्रश्‍न पत्रिका पाठविण्याचे काम खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय कुणी घेतला, याची चौकशी करणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला. यावर सीआयडीच्या चौकशीत सर्वच सत्य बाहेर येईल, असे वायकर यांनी सांगितले. या लक्षवेधीत विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या अन्य प्रश्‍नांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी देखील उत्तरे दिली.  

टॅग्स :मुंबईअमरावतीशिक्षण क्षेत्ररवींद्र वायकर