Join us
Daily Top 2Weekly Top 5

देवाच्या शोधासाठी समुद्रमंथन

By admin | Updated: October 24, 2014 01:08 IST

वाळे गावामध्ये पारंपरिक पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्यात आला. समुद्रामधून देवाच्या मूर्ती शोधून गुरुवारी गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली.

नवी मुंबई : दिवाळे गावामध्ये पारंपरिक पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्यात आला. समुद्रामधून देवाच्या मूर्ती शोधून गुरुवारी गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली. पाच दशकांची परंपरा असलेल्या या यात्रेनिमित्त बहिरीनाथाचे दर्शन घेण्यास हजारो भाविक उपस्थित होते. नवी मुंबई हायटेक शहर म्हणून विश्वभर ओळखले जात असले तरी येथील मूळ गावांमधील रहिवासी त्यांची परंपरा जपत आहेत. या परंपरेमध्ये दिवाळेमधील भैरीनाथाच्या यात्रेचाही समावेश होतो. बहिरीनाथाची मूर्ती वर्षभर घारापुरी बेटासमोरील समुद्रात असते. नरकचतुर्दशी दिवशी ४०० ते ५०० ग्रामस्थ होडी घेऊन समुद्रात जातात. काठीच्या साहाय्याने मूर्ती शोधून काढतात. मोठ्या जल्लोषामध्ये मूर्ती गावामध्ये आणली जाते. गावातील मनोज कोळी यांच्या घरात प्रतिवर्षीप्रमाणे बहिरीनाथ महाराजांची स्थापना केली. यात्रेसाठी ठाणे व रायगड जिल्ह्यामधून भाविक दर्शनासाठी आले होते. गावामधून देवाची मिरवणूक काढण्यात आली. बहिरीनाथ महाराजांची सेवा करण्यासाठी कृष्णाई कोळी या ७० वर्षांच्या आजीबाई रात्रंदिवस झटत असतात. लक्ष्मीपूजन व बहिरीनाथ महाराजांचा पाळखी सोहळा हा आमच्यासाठी सर्वात मोठा क्षण असल्याचे दिवाळेमधील रहिवासी उदय जोशी यांनी सांगितले. या वेळी कोळीवाड्यात रांगोळी आणि आकर्षक रोषणाईने घरोघरी सजावट केली जाते. पालखीला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण कोळीवाड्यात पालखी फिरविली जाते. या वेळी महिलावर्गदेखील पारंपरिक कोळीनृत्य सादर करतात. (प्रतिनिधी)