Join us

प्रेयसीशी चॅटिंग केल्याच्या रागाने तरुणाला चोप

By admin | Updated: July 15, 2015 02:06 IST

एक विवाहित तरुण आपल्या प्रेयसीसोबत तासन्तास चॅटिंग करीत असल्याचे समजताच प्रियकराने फिल्मी स्टाईलने त्या तरुणाचा शोध घेत अपहरण करून मारहाण केली.

- मनीषा म्हात्रे, मुंबईएक विवाहित तरुण आपल्या प्रेयसीसोबत तासन्तास चॅटिंग करीत असल्याचे समजताच प्रियकराने फिल्मी स्टाईलने त्या तरुणाचा शोध घेत अपहरण करून मारहाण केली. आणि गयावया करीत असलेल्या या तरुणाचा व्हीडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करण्याची घटना घाटकोपर येथे घडली. अखेर आरोपींच्या तावडीतून कशीबशी सुटका करून तरुणाने घर गाठून झालेला प्रकार पत्नीला सांगताच ही धक्कादायक घटना उघड झाली.घाटकोपरमधील काजू टेकडी परिसरात राहाणाऱ्या आरोपी प्रियकर शुभम जुवटकर याचे त्याच परिसरातील निशा (नाव बदललेले आहे़) या तरूणीसोबत प्रेमसंबध आहेत. दोघांचे तासन्तास फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग सुरू असायचे. काही दिवसांपासून प्रेयसीच्या चॅटिंगदरम्यान उशिराने येणारा प्रतिसाद, होत असलेली टाळाटाळ, यामुळे ती दुसऱ्या कोणासोबत बोलत असल्याचा संशय जुवटकरला आला. भेटीदरम्यानही निशा कुणासोबत तरी बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले़ तिला विश्वासात घेऊन ती कुणाशी बोलते याची माहिती त्याने काढली. त्यात संदीप शिंदे (३३) या विवाहित तरुणाचे नाव समोर आले.शुभमने शिंदेच्या घरचा पत्ता शोधून घर गाठले. मात्र तो घरी सापडला नाही. शिंदेचा मित्र असल्याचे सांगून त्याच्या पत्नीकडून त्याचा मोबाइल क्रमांक मिळवला. शनिवारी मोबाइल क्रमांकाने शिंदेशी संपर्क साधून शुभम त्याच्या सहा मित्रांसोबत चकाला रोड येथील त्याच्या नोकरीच्या ठिकाणी धडकला. तेथे शुभमने त्याला गाडीत घेऊन घाटकोपर येथील खोलीत डांबले. ‘यापुढे प्रेयसीशी बोललास तर ठार मारेन’, अशी धमकी देत शुभमने शिंदेला बेदम चोप दिला. एवढ्यावरच शुभम थांबला नाही, तर त्याच्या मारहाणीनंतर गयावया करणाऱ्या शिंदेचा व्हिडीओ काढून तो सोशल नेटवर्किंग साइटवर त्याने अपलोड केला. बराच वेळ खोलीत डांबल्यानंतर रात्री उशिराने शिंदेने त्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घर गाठले. रक्ताच्या थारोळ्यात घरी परतलेल्या शिंदेने सारी हकीगत पत्नीला सांगताच तीही थक्क झाली. तिने शिंदेला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करून याची माहिती घाटकोपर पोलिसांंना दिली. शिंदे हा जीव्हीके सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी जुवटकरसह त्याच्या साथीदारांविरोधात अपहरण, शिवीगाळ मारहाण आणि आयटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला. सतीश बबन खोपडे (२७), दिनू सिंंघ (२१), प्रथमेश शेडगे (१९) यांच्यासह आणखी दोघा अल्पवयीन आरोपींना मंगळवारी घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे.