- सुशांत मोरे, मुंबई पाण्यातील साहसी खेळ (वॉटर स्पोर्ट्स), कॅफेटेरिया, रेस्टॉरंट यासह पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक खेळ आणि सुविधा युरोपातील चौपाट्यांवर दिसतात. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चौपाट्या यात बरेच मागे पडतात. त्यामुळे अस्वच्छ आणि काहीच सोयीसुविधा नसलेल्या मुंबईतील चौपाट्यांकडे पर्यटक फिरकतानाही दिसत नाहीत. हे पाहता एमटीडीसीने (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) मुंबईतील वर्सोवा, जुहू आणि गिरगाव या तीन चौपाट्यांना नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. या चौपाट्यांवर पाण्यातील खेळ, रेस्टॉरंट, अॅम्फी थिएटरसह अन्य सुविधा पर्यटकांना देण्यात येणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या संख्येने पर्यटक येतात. राज्यातील कानाकोपऱ्यातून, त्याचबरोबर अन्य राज्यांतून तसेच परदेशातूनही पर्यटक मुंबई भेटीवर येत असतात. या भेटीत गेट वे आॅफ इंडिया, म्युझियम, रेल्वे स्थानक, एस्सेल वर्ल्ड, हॉटेल्स, धार्मिक स्थळांसह काही मोजक्या ठिकाणांना भेटी देतात. मात्र मुंबईतील चौपाट्यांकडे पाठ फिरवतानाच दिसतात. मुंबईतील वर्सोवा, जुहू आणि गिरगाव चौपाट्या या मुंबईकरांसाठी महत्त्वाच्याच. मात्र या चौपाट्यांवर शनिवार आणि रविवार वगळता अन्य दिवशी तुरळक गर्दी पाहण्यास मिळते. असलेली अस्वच्छता, तृतीयपंथी, भिकारी आणि फेरीवाल्यांकडून होणारा त्रास आणि फारसे पाहण्यासारखे काही नसल्याने मुंबईकरही चौपाटीवर जाण्यास फारसे उत्सुक नसतात. एकूणच चौपाट्यांची ही अवस्था पाहता मुंबईतील या तीन चौपाट्यांना पर्यटनाच्या दृष्टीने नवा लूक देण्याचा निर्णय एमटीडीसीने (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) घेतला आहे. त्यानुसार या तीनही चौपाट्यांचा पीपीपी मॉडेलने (सार्वजनिक-खासगी भागीदारी) विकास केला जाणार आहे. या चौपाट्यांवर मरिना (बोट पार्किंग), पर्यटकांसाठी शॉवर आणि टॉयलेट, पक्षी संग्रहालय, अॅम्फी थिएटर (प्रेक्षागृह किंवा नाट्यगृह), कॅफेटेरिया, वाहनांसाठी पार्किंग उभारण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाण्यातील खेळही चौपाट्यांवर उपलब्ध केले जाणार असून, यात बोटींचे विविध प्रकार पर्यटकांना दिले जातील. पहिल्या टप्प्यात एमटीडीसीकडून वर्सोवा चौपाटीला लूक देण्यात येणार असून, त्यासाठी सल्लागार म्हणून पी. के. दास असोशिएट या वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक अहवालही तयार करण्यात आला असून, त्याचे सादरीकरण येत्या काही दिवसांत एमटीडीसीकडे केले जाणार आहे. त्यानंतर यात काही बदल हवा असल्यास एमटीडीसीकडून तशा सूचना केल्या जातील. या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर त्याचे सादरीकरण केले जाईल आणि त्यांच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. मुंबईतील तीन चौपाट्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यात वर्सोवा, जुहू आणि गिरगाव चौपाट्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात वर्सोवा चौपाटीचे काम केले जाईल. या चौपाट्यांचा विकास झाल्यास पर्यटनाच्या दृष्टीने मुंबईला वेगळे महत्त्व प्राप्त होईल.-सुबोध किनळेकर, एमटीडीसी-साहसी क्रीडा व्यवस्थापक
चौपाट्यांना मिळणार नवा लूक
By admin | Updated: July 14, 2015 03:05 IST