Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी घातला चौपाटीचा घाट

By admin | Updated: June 15, 2015 23:24 IST

मुंब्रा खाडीवर होऊ घातलेल्या चौपाटीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर आता येथील रेती व्यावसायिकही त्याविरोधात एकवटले आहेत.

ठाणे : मुंब्रा खाडीवर होऊ घातलेल्या चौपाटीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यानंतर आता येथील रेती व्यावसायिकही त्याविरोधात एकवटले आहेत. या चौपाटीला आमचा विरोध नाही, परंतु विकास आराखड्यासह या किनाऱ्याचा सातबारा उतारा, नियोजन, निधी आणि पुनर्वसनाचे धोरण निश्चित नसताना चौपाटी तयार करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा घाट असल्याचा आरोप खारी मुंब्रा पारसिक रेतीबंदर व्यापारी मंडळाने शुक्रवारी केला. केवळ एका स्थानिक आमदाराच्या राजकीय दबावापोटी जर अशा प्रकारे चौपाटी विकसित केली जात असेल तर आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही आमच्या जमिनी सोडणार नसल्याचा इशारा या व्यावसायिकांनी दिला आहे.येथील रेती व्यावसायिकांनी टी. चंद्रशेखर हे आयुक्त असताना कोणताही मोबदला न घेता आपल्या जमिनी रस्ता रुंदीकरणासाठी दिल्या आहेत. आता या ठिकाणी असणाऱ्या २.८ किमीच्या किनाऱ्यावर सुशोभीकरण करण्याचा घाट घातला जात असल्याने त्याला येथील स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. मुळातच या किनाऱ्याबाबत मेरीटाइम बोर्ड, महसूल आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्याचेही मंडळाने सांगितले. येथील सुमारे ९९ रेती व्यावसायिक एकवटले असून त्यांनी या चौपाटीच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. सध्या या २.८ किमी लांबीच्या या किनाऱ्याचे सुशोभीकरण कसे करायचे, याचा निर्णय झालेला नसल्याची माहिती या मंडळाचे समन्वयक दशरथ पाटील यांनी दिली. यासंदर्भात पालकमंत्री आणि महसूलमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या सुशोभीकरणास स्थगिती दिली आहे. तसेच या भागात डुबीने रेती काढण्यासही परवानगी दिली आहे. मात्र, जिल्हाधिकारी या मंत्र्यांच्या आदेशांपेक्षा प्रधान सचिवांचे पत्र सादर करा, असे सांगून येथेच कारवाई करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुळातच उल्हास खाडीवर ११ रेतीबंदरे असताना मुंब्रा रेतीबंदरवरच कारवाई का केली जात आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय, येथील स्थानिक आमदारानेसुद्धा येथील रेती व्यावसायिकांचे घोडबंदरला स्थलांतर करा, असे सांगितले आहे. परंतु, त्या आमदाराचे नाव घेण्यास पाटील यांनी इन्कार केला. विशेष म्हणजे आजच्या बैठकीला शिवसेना, काँग्रेस आणि भाजपाची मंडळी हजर होती. त्यामुळे आता ते स्थानिक आमदाराविरोधात एकवटले असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)