Join us

चित्रनगरी गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीसह चौघे गजाआड

By admin | Updated: June 5, 2015 01:37 IST

राजू शिंदे यांच्या हत्येचा कट आखणारा मुख्य आरोपी सुरेश गायकवाड याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी संध्याकाळी जोगेश्वरीतून अटक केली.

मुंबई : शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे सरचिटणीस व व्यावसायिक श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे यांच्या हत्येचा कट आखणारा मुख्य आरोपी सुरेश गायकवाड याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी संध्याकाळी जोगेश्वरीतून अटक केली. तर गायकवाडच्या इशाऱ्यावरून शिंदेंवर जवळून गोळ्या झाडणाऱ्या शूटरसह एकूण तिघांना आरे सब पोलिसांनी अटक केली आहे. संदीप खैरनार (३१), सतीश मोरे (२२) आणि जितू धीवर (३२) अशी आरे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापैकी खैरनारने २२ मे रोजी गोरेगावच्या चित्रनगरीत शिंदेंवर अत्यंत जवळून तीन गोळ्या झाडल्या होत्या. तर तर मोरे हा मोटारसायकल चालवत होता. एसीपी राजन घुले यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास या ठिकाणी सापळा रचून तिघांच्या मुसक्या आवळल्या. अटक आरोपींना न्यायालयाने ८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत धाडल्याची माहिती अप्पर आयुक्त फत्तेसिंह पाटील यांनी दिली. दरम्यान, २२ एप्रिलला गायकवाड आणि त्याचे साथीदार चित्रनगरीत शिंदेंना भेटले होते. शिंदेंकडील काही कंत्राटे किंवा कामे मिळावेत अशी मागणी गायकवाडने केली होती. मात्र शिंदेंनी त्यास नकार दिला. तेव्हा गायकवाडने शिंदेंना छोटा राजन टोळीचा गँगस्टर विक्की मल्होत्राच्या नावाने धमकावले होते. त्यानंतर शिंदे व त्यांच्या साथीदारांनी गायकवाडला मारहाण करत चित्रनगरीतून हुसकावून लावले होते. त्याचाच बदला घेण्यासाठी गायकवाडने शिंदेंच्या हत्येचा कट रचल्याची माहिती पुढे आली आहे. गायकवाडला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाईल.