- प्राची सोनवणे, नवी मुंबईनवरात्रोत्सवातील नऊ दिवसांमध्ये होणाऱ्या दांडिया रास खेळण्यासाठी या कोरिओग्राफर्सच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे शिकण्यासाठी सर्वच वयोगटातील व्यक्तींचा कल वाढत असल्याचे पहायला मिळते. नवरात्रीच्या तोंडावर गेल्या चार-पाच वर्षांमध्ये खास गृहिणी, नोकरदार महिलांसाठी गरबा प्रशिक्षणाचे वर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. गरबा शिकण्यासाठी क्लासला जाणाऱ्या या महिला आता मात्र चक्क ‘स्ट्रेस बस्टर’ म्हणून गरब्याकडे पाहत आहेत. केवळ नवरात्रीतच नाही, तर लग्न, संगीत, डीजे ते अगदी दहीहंडी, गणपतीमध्येही गरबा खेळण्यासाठी महिला वर्षभर गरब्याचे प्रशिक्षण घेतात. या माध्यमातून घरातल्या किंवा आॅफिसातल्या समस्या दूर ठेवतात व ताज्यातवान्या होतात.पूर्वी केवळ तरुण मंडळी नवरात्रोत्सवाआधी गरबा, दांडियाचे प्रशिक्षण घेत असे. मात्र हळूहळू त्यांचे कुटुंबीयही उत्साहाने सहभागी होऊ लागले. गुजराती समाजाशिवाय इतर भाषकांनाही गरब्याच्या तालाची भुरळ पडली. यात अनेक गृहिणी, मध्यमवयीन महिलांचा समावेश होता. त्यामुळे अशा उत्सवांमध्ये जाऊन केवळ आपल्याला हवा तसा गरबा खेळण्याऐवजी त्यातील नजाकत समजून हा नृत्यप्रकार सादर करता यावा, यासाठी त्या तरुणांइतक्याच आग्रही झाल्या. त्यातूनच अनेक ठिकाणी खास गृहिणी व नोकरदार महिलांसाठी गरब्याच्या विशेष बॅचेस सुरू झाल्या. दुर्गोत्सवानिमित्त होणाऱ्या ९ दिवसांच्या या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांबरोबरीनेच पुरुषही उत्सुक आहेत. दिवसेंदिवस लोकांचा वाढता कल लक्षात घेता शहरात विविध ठिकाणी नृत्य प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले आहे. यामध्ये गरबा नृत्य, दांडिया रास, गुजराती स्टाईलचे गरबा नृत्य असे विविध नृत्य प्रकार शिकविले जात आहेत. एक दिवसापासून ते १० दिवसांपर्यंतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. काही ठरावीक स्टेप्स शिकण्यासाठी दिवसानुसार १००० ते ३००० रुपये आकारले जातात, तर संपूर्ण डान्स बसवायचा असेल तर आठवड्याभरासाठी पाच ते आठ हजार रुपये दर आकारले जात असल्याची माहिती कोरिओग्राफर्सने दिली. दहा दिवसांत अनेक कोरिओग्राफर्स किमान दहा हजारांची कमाई करतात. स्ट्रेस बस्टर दांडियागरबा खेळल्यानंतर डिप्रेशन कमी होते. संगीताच्या तालावर बेभान होऊन नाचल्याने शारीरिक व्यायामही होतो. फिटनेससाठी गरबा खेळला जातो. नवरात्रीचे रंगीत वातावरण, यात मिळणारी ऊर्जा व या नऊ दिवसांमध्ये कमी होणारे वजन यामुळे महिलांचा याकडे कल वाढत असल्याचे खारघरच्या नॅचरल इफेक्ट्स डान्स अॅकॅडमीचे कोरिओग्राफर दुर्गेश राजपूत याने दिली.
कोरिओग्राफर्सचे भाव वधारले
By admin | Updated: October 7, 2015 00:19 IST