Join us

चिंचणी-धा.डहाणू रस्ता जलमय

By admin | Updated: June 23, 2015 23:31 IST

डहाणू तालुक्यात पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक गावातील रस्ते, साकव पाण्याखाली गेले असून जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे

डहाणू : डहाणू तालुक्यात पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक गावातील रस्ते, साकव पाण्याखाली गेले असून जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. त्यातच चिंचणी-धाकले डहाणू या १८ कि. मी. च्या रस्त्यावर हजारो मोठ मोठे खड्डे पडल्याने तसेच शिवाजी चौक, दमणभट, बहाड, सरकारी आंबा या भागातील रस्ता पाण्याखाली गेल्याने दररोज लहान मोठे अपघात होत असून हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे. मात्र डहाणू, जव्हार, सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दरवर्षी दुर्लक्ष करीत असल्याने नागरीक तसेच वाहनचालकांत तीव्र संताप आहे.डहाणू शहराला जोडणाऱ्या चिंचणी-धा.डहाणू या मुख्य रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने अणुशक्ती केंद्राच्या निधीतून बांधण्यात आलेला ४०० मी. काँक्रीट रस्ता वगळता उर्वरीत रस्त्यावर दहा वर्षापासून खड्डे भरण्याचाच कार्यक्रम सा. बा. विभागामार्फत सुरू असल्याने दरवर्षी येथील रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त होते. खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने पावसाळ्याच्या चार महिन्यात शेकडो अपघात होत असत. गेल्या चोवीस तासात पावसाने चांगलेच झोडपले असल्याने बहाड येथील रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांत भीती आहे. (वार्ताहर)