Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी खंडणीसाठी चिमुकलीची हत्या

By admin | Updated: December 26, 2016 05:18 IST

एक कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी व्यापाऱ्याच्या साडेतीन वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून, तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली.

मुंबई : एक कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी व्यापाऱ्याच्या साडेतीन वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून, तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. नागपाडा येथील एका इमारतीच्या गच्चीवर बालिकेचा मृतदेह आढळून आला असून, तिच्या घराशेजारी राहणाऱ्या दोघा किशोरवयीन मुलांनी हे कृत्य केल्याचे तपासातून समोर आले आहे. जुनेरा मुमताज खान असे या बालिकेचे नाव आहे. तिला मारणाऱ्या दोघा १७ वर्षीय मुलांना जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ५ डिसेंबरला तिचे अपहरण केल्यानंतर, त्याच रात्री त्यांनी मोबाइलच्या चार्जरने गळा आवळून तिला मारले होते. त्यानंतर, एका पिशवीत मृतदेह भरून इमारतीच्या गच्चीवर ठेवला होता. या दोघांनी तिच्या वडिलांकडे सुरवातीला एक कोटी रुपयांची मागणी केली होती, त्यानंतर २८ लाखांपर्यंत त्यांनी तडजोड केली होती, असे जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप शिंदे यांनी सांगितले.भंगार व्यापारी मुमताज खान हे नागपाड्यातील हाजी कासम चाळीत राहतात. याच इमारतीतील जावेद व वसिम (बदललेली नांवे) दोघा १७ वर्षांच्या युवकांनी जुनेरा हिला खेळविण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर नेले. त्यांनी निर्जन ठिकाणी मोबाईल चार्जरच्या वायरीने गळा दाबून तिची हत्या केली. नंतर एका मोठ्या पिशवीत तिचा मृतदेह कोंबून काजीपुरा भागातील एका पडिक इमारतीच्या गच्चीवर नेऊन लपवून ठेवला. त्यानंतर काहीही घडले नसल्याच्या अविर्भात ते खान यांच्या घरी येऊन जुनेराच्या शोधासाठी प्रयत्न करत असल्याचे भासवित होते.रात्री उशिरापर्यत जुनेरा न सापडल्याने खान यांनी पोलिसांत तक्रार केली. दुसऱ्या दिवशी एका अज्ञात नंबरवरून खान यांना फोन आला आणि मुलीचे अपहरण केले असून ती सुखरूप हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी केली. अखेर २८ लाख रुपये कळवा येथे आणून देण्यास सांगितले. ही रक्कम घेऊन जाण्याची तयारी जावेद व वसिम यांनी दाखविल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपल्या कृत्याची कबुली दिली आणि २० दिवसांनंतर या खुनाचा उलगडा झाल्याचे परिमंडळ -१चे पोलीस उपआयुक्त मनोज शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)चैनीसाठी अपहरणाचा कटच्जावेद व वसिम हे दोघेही अभ्यासात अत्यंत हुशार असून, सिद्धार्थ महाविद्यालयात अकरावी शास्त्र शाखेत शिकत आहेत. खान यांच्याकडील महागडी मोटार व व्यापारातून मिळत असलेल्या नफ्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती त्यांना होती. च्जुनेराचे अपहरण करून लाखो रुपये उकळून मुंबईबाहेर पळून जाऊन चैन करण्याच्या हेतूने त्यांनी हा कट रचला. त्यानुसार, जुनेराला घरातून बाहेर घेऊन गेले. मात्र, घरच्या आठवणीने ती रडू लागल्याने त्यांनी त्याच रात्री तिला मारले, असे वरिष्ठ निरीक्षक दिलीप शिंदे यांनी सांगितले.