Join us

रणरणत्या उन्हात थंडाव्याचे आसरे

By admin | Updated: April 24, 2017 02:48 IST

शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुटी लागली असली, तरी शहरासह उपगनरांत तापमानाचा पारा चढलेला असल्याने लोकांना घराबाहेर पडणेही नकोसे वाटत आहे.

अक्षय चोरगे / मुंबईशाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुटी लागली असली, तरी शहरासह उपगनरांत तापमानाचा पारा चढलेला असल्याने लोकांना घराबाहेर पडणेही नकोसे वाटत आहे. अशा परिस्थितीत थंड हवेच्या शोधात लोकांची पावले आपोआप उद्यानांकडे वळत आहेत. मात्र शहरातील बहुतेक उद्यानांची दुरवस्था असताना चेंबूरमधील उद्यानांना मात्र जत्रेचे रूप आल्याचे दिसत आहे. महापालिकेने येथील उद्यानांची अचूक देखरेख केल्याने संबंधित उद्यानांना अच्छे दिन आले आहेत.चेंबूरमधील ना.ग. आचार्य उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, डी.के. सांडू उद्यान, स्वातंत्र्यसैनिक उद्यान, महात्मा गांधी मैदान, युनियन पार्क अशा प्रमुख उद्यानांमध्ये दुपारच्या वेळीही बच्चेकंपनीसह पालक मंडळी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. याउलट सायंकाळी तर या उद्यानांना जत्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. बहुतेक उद्याने ही दुपारीही खुली असून स्थानिक या ठिकाणी विसाव्यासाठी येत आहेत. याउलट दुपारच्या वेळी बंद असलेली काही उद्याने दुपारीही खुली ठेवण्याची मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.बच्चेकंपनीची धमाल-शाळांना सुट्ट्या लागल्याने बच्चेकंपनीने उद्यानांतच ठाण मांडले आहे. आजी-आजोबांसह बहुतेक बच्चेकंपनी सायंकाळच्या वेळी उद्यानांमध्ये कल्ला करताना दिसत आहेत. उद्यानांमधील झोपाळ्यांपासून घसरगुंडी, सी-सॉ अशा विविध खेळण्यांचा ताबा चिमुरड्यांनी घेतला आहे.घरात गरमीमुळे होणाऱ्या काहिलीपासून स्वत:ला वाचवून दुपारच्या उन्हात थंडाव्याचा अनुभव घेण्यासाठी नागरिक उद्यानांचा पर्याय निवडत आहेत. टोलेजंग इमारतींच्या शहरात उद्यानांमध्येच काही प्रमाणात वृक्ष शिल्लक आहेत. त्यामुळे शहराबाहेर थंड हवेच्या ठिकाणी जाणे किंवा घरात एअर कंडिशनर (एसी) बसवणे खर्चीक ठरणाऱ्या नागरिकांसाठी ही उद्यानेच थंडाव्याची ठिकाणे बनली आहेत.