Join us

मुलांची पसंती राणीबाग!

By admin | Updated: January 19, 2016 02:33 IST

सोशल नेटवर्किंग साइट्स आणि व्हिडीओ गेमच्या आहारी गेल्याने घराबाहेर पडणे बच्चेकंपनीला पसंत नसल्याची चर्चा सातत्याने होत आहे.

चेतन ननावरे ,  मुंबईसोशल नेटवर्किंग साइट्स आणि व्हिडीओ गेमच्या आहारी गेल्याने घराबाहेर पडणे बच्चेकंपनीला पसंत नसल्याची चर्चा सातत्याने होत आहे. मात्र मुंबईसारख्या काँक्रीटच्या जंगलात तब्बल ५३ एकरवर पसरलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कारण २०१५ सालात प्रत्येक महिन्याला सरासरी १५ हजार चिमुरड्यांनी राणीच्या बागेला भेट दिल्याची माहिती समोर आली आहे.दरवर्षी लाखो पर्यटक राणीच्या बागेला भेट देतात. मात्र गेल्या काही वर्षांत प्राण्यांच्या घटत्या संख्येमुळे पर्यटकांनी राणीच्या बागेकडे पाठ फिरवल्याची चर्चा होती. गेल्या वर्षी एकूण १२ लाख ३६ हजार ९३६ पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिल्याच्या माहितीने या सर्व चर्चांना चोख उत्तर दिले आहे. एकूण भेट दिलेल्या पर्यटकांत १० लाख ५६ हजार ६५९ प्रौढ पर्यटकांचा समावेश असून बच्चेकंपनीची संख्या १ लाख ८० हजार २७७ इतकी आहे. म्हणजेच राणीच्या बागेला भेट दिलेल्या पर्यटकांत लहान मुलांची संख्या ही सुमारे १५ टक्क्यांपर्यंत आहे. याचाच अर्थ बच्चेकंपनी आणि प्रौढ पर्यटकांना आजही राणीच्या बागेने भुरळ घातलेली आहे.केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार राणीच्या बागेचा पुनर्विकास होत नाही, तोपर्यंत नवीन प्राणी आणता येणार नसल्याची माहिती प्राणिसंग्रहालय प्रशासनाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. ते म्हणाले की, अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे लहान मुलांना आवडणाऱ्या हत्ती, सांबर, हरीण या शाकाहारी प्राण्यांच्या पिंजऱ्यात केलेले बदल होय. त्यामुळे हे प्राणी चिमुरड्यांना सहज नजरेस पडतात. शिवाय प्रत्येक प्राण्याच्या पिंजऱ्याबाहेर त्या-त्या प्राण्याची वैयक्तिक माहिती देणारे लावलेले फलक मुलांच्या उत्सुकतेमध्ये अधिक भर घालत आहेत. चिमुरड्यांना खेळण्यासाठी मैदानासह विविध साहित्याचा समावेशही प्रशासनाने केला आहे. त्यामुळे प्राण्यांची संख्या भविष्यात वाढणार असली, तरी आहे त्या साधनांमध्ये सध्या पर्यटकांच्या विरंगुळ्यासह मनोरंजनाची पुरेपूर काळजी प्रशासन घेत आहे.