Join us  

बच्चे कंपनी खूश होणार, राणीच्या बागेत येणार नवे प्राणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 10:33 AM

राणीच्या बागेत पेंग्विननंतर आणखी नव्या प्राण्यांची मुंबईकरांना उत्सुकता असली तरी त्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई : राणीच्या बागेत पेंग्विननंतर आणखी नव्या प्राण्यांची मुंबईकरांना उत्सुकता असली तरी त्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. देशातील अन्य प्राणिसंग्रहालयातून राणीच्या बागेत काही प्राणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिंहाच्या दोन जोड्या, लांडगा आणि पाणमांजर असे नवे पाहुणे बागेत येणार आहेत. बागेतील पेंग्विनचा परिवार आता वाढला आहे. १८ पेंग्विन बागेत आहेत. सिंहाच्या दोन जोड्या मिळवण्यासाठी तीन प्राणिसंग्रहालयाशी बोलणी सुरू आहे, मात्र अजून  प्रतिसाद मिळालेला नाही. 

जुनागढमधील सक्करबाग आणि केवाडिया संग्रहालय तसेच हैदराबादमधील संग्रहालयाशी सिंह मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण या तीनही संग्रहालयांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.     

 राणीच्या बागेत आणखी पर्यटक यावेत यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच नवे प्राणी आणले जाणार आहेत. अन्य संग्रहालयातून प्राणी घेताना पैशांचे व्यवहार होत नाहीत, तर प्राण्याच्या मोबदल्यात प्राणी दिले जातात. 

सिंहाच्या जोडीच्या आगमनाची पूर्वतयारी केली असून पिंजरे तयार केले आहेत. सिंह पाहता यावेत म्हणून प्रेक्षक गॅलरीही तयार केली आहे.  यासाठी आठ कोटी रुपये खर्च केले आहेत. 

पेंग्विनला पाहण्यासाठी गर्दी :

अलीकडच्या काळात बागेला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. खास करून पेंग्विन पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. पेंग्विन पाहण्यासाठी साप्ताहिक सुटीच्या दिवशी पर्यटकांची पावले बागेकडे वळू लागली आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्याने महसुलातही वाढ झाली आहे.  पेंग्विनच्या मोबदल्यात सिंह आणले जाणार आहेत. मात्र पेंग्विनचा देखभाल खर्च जास्त असतो. त्यांच्यासाठी विशिष्ट तापमान असणारी अधिवास व्यवस्था करावी लागते. रोज पुरेपूर काळजी घ्यावी लागते. 

टॅग्स :मुंबईराणी बगीचा