- जितेंद्र कालेकर, ठाणेएखादा गुन्हा घडल्यानंतर हद्दीच्या वादात अडकणारे पोलीस सर्वश्रुत आहेत. परंतु, ठाणे ग्रामीण हद्दीतील भार्इंदर येथून गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता झालेल्या १७वर्षीय सुनील रामदयाल चौधरी या मुलाचा ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने पुण्यात जाऊन शोध घेतला. यात ठाणे ग्रामीण, शहर किंवा पुणे शहर अशी कोणतीही हद्दीची भिंत न ठेवता बेपत्ता झालेल्या या तरुणाचा शोध लावल्यानंतर त्याच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.सुनील २१ आॅगस्ट रोजी घरातून अचानक बेपत्ता झाला होता. ‘माझ्या जीवनाचे मी बघेल,’ असे त्रोटक वाक्य असलेले चार-पाच ओळींचे एक पत्र त्याने घरात ठेवले. फेसबुकवरही एका मित्राला त्याने ‘पिताजी को बोलना, मैं मेरे मन से जा रहा हूँ,’ अशी अर्धवट पोस्ट केली. याव्यतिरिक्त त्याने कोणालाही फोन न केल्यामुळे तो नेमका कुठे बेपत्ता झाला, काही घातपात तर नाही झाला ना? अशा अनेक शंकांनी ठेकेदार रामदयाल चौधरींनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे धाव घेतली. घरातून त्याने तीन मोबाइल, एक किमती घड्याळ, मोटारसायकल आणि काही रोकडही नेली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार यांनी हे प्रकरण खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी. कदम यांच्याकडे सोपविले. या पथकातील निरीक्षक नासीर कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर जोशी, हवालदार संजय सातोर्डेकर, प्रशांत बुरके, अंकुश भोसले, सुहास खताते आणि नितीन ओवळेकर आदींनी त्याच्याकडील मोबाइलच्या आधारे त्याच्या मोटारसायकलचा शोध घेतला. ही मोटारसायकल पुणे कॅम्प भागातील एमजी रोडवर पे अॅण्ड पार्कमध्ये उभी केली होती. मोटारसायकलचा शोध घेतल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी त्याला येथूनच या पथकाने ताब्यात घेतले. त्याला बिझनेस करायचा होतासुनीलने चांगले पदवीधर व्हावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. तर, आपल्याला शिकायचे नसून बिझनेस करायचा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यातूनच वडिलांशी वैचारिक सूर न जुळल्याने राष्ट्रीय अॅथलिट असूनही त्याने घर सोडले. दरम्यानच्या काळात तो पुण्यात एका भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होता. त्याला शोधल्यानंतर ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. ग्रामीण पोलिसांनी त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
हद्दीच्या पल्याड जाऊन घेतला मुलाचा शोध
By admin | Updated: September 8, 2015 01:45 IST