Join us
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरी घटली

By admin | Updated: June 12, 2014 01:18 IST

रायगडात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बालमजुरांची संख्या कमी असल्याचे गेल्या काही वर्षात टाकलेल्या धाडसत्रावरून स्पष्ट झाले आहे.

प्रशांत शेडगे, पनवेलरायगडात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बालमजुरांची संख्या कमी असल्याचे गेल्या काही वर्षात टाकलेल्या धाडसत्रावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी बालकामगार विरोधी कृ ती समितीने टाकलेल्या ११ धाडींत फक्त दोन बालकामगार आढळून आले आहेत. त्यापैकी एक जण १४ वर्षावरील असल्याचे निष्पन्न झाले. एकंदरीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी, निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून केलेली जनजागृती, त्याचबरोबर आस्थापनांकडून मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद या सर्व गोष्टींमुळे रायगडजिल्हा बालमजुरीमुक्तीकडे वाटचाल करू लागला आहे.शहरी व ग्रामीण भागातील बालमजुरीला आळा बसावा यासाठी शासनाने १९८६ साली बालमजुरी कायदा पास झाला. ज्या वयात मुलांनी खेळणे-बागडणे, शाळेत जायचे असते, त्या वयात ती राबताना दिसतात. आजही शहरी भागात हे चित्र पहावयास मिळते. शासनाने १४ वर्षाखालील मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये व त्यांचे जीवन सुदृढ व्हावे यासाठी त्यांना काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याचे पालन व्हावे यासाठी शासनस्तरावर कठोर नियम केले आहेत. जिल्ह्यातील बालमजुरीचे घटलेले प्रमाण पाहून जिल्ह्यात सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून याबाबत कठोर उपाययोजना तसेच बालमजुरीविरोधात जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्याचाहा परिणाम असल्याचे स्पष्ट आहे. जिल्ह्यात समता केंद्र, युसूफ मेहर अली सेंटर, तारा यासारख्या सामाजिक संस्था बालकामगार विरोधी मोहीम राबविताना दिसतात. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत या कायद्याबाबत विविध सामाजिक उपक्रमांतून माहिती देऊन बालमजुरी रोखण्यात यश आले आहे.शासनाने एकही मूल शाळाबाह्य राहू नये म्हणून सर्वशिक्षा अभियान सुरू केले आहे. त्याचीही बालमजुरी रोखण्यास मदत झाली आहे. तत्कालीन सहाय्यक कामगार आयुक्त अशोक चिवटे, सु. बा. बागुल यांच्यासह विद्यमान सहाय्यक आयुक्त शाम जोशी यांनी बालमजुरी रोखण्यासाठी वेळोवेळी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. परिणामी रायगड जिल्ह्यात बालकामगार प्रथा मोडीत काढण्यात यश आले आहे. आगामी काळात बालकामगारविरोधी कृती समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी याकामी पुढाकार घेतला असून जनजागृती अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या आजूबाजूला कोणी १४ वर्षाखालील मुलेकाम करीत असतील तर त्वरीत आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून या कामी हातभार लावावा, असे आवाहन शाम जोशी यांनी केले आहे.