Join us

बालिकेवर अत्याचार करणारा कोठडीत

By admin | Updated: January 11, 2016 02:24 IST

शाळेच्या वार्षिक समारंभाच्या कार्यक्रमानंतर एकट्याच राहिलेल्या पाचवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या सोमनाथ यादवची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे

मुंबई: शाळेच्या वार्षिक समारंभाच्या कार्यक्रमानंतर एकट्याच राहिलेल्या पाचवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या सोमनाथ यादवची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी यादवची कसून चौकशी सुरू केली आहे. यादव हा शाळेच्या उपाहारगृहातील कर्मचारी होता. या मुलीची वैद्यकीय तपासणी सायन रुग्णालयात करण्यात आली. त्याचा अहवाल येत्या दोन दिवसांत येणार आहे.पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बलात्कार आणि पॉस्को कायद्यान्वये सोमनाथ यादववर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. शनिवारी आरोपी यादवला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी शालेय प्रशासनाचा निष्काळजीपणादेखील समोर आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक जगदाळे यांनी सांगितले. मुलांची काळजी घ्या - पोलीस उपायुक्तदादर येथील पाचवीतल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पालकांच्या मनात धडकी भरली आहे. शालेय प्रशासनाने लहान मुले आणि मुलींच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, या बाबत वारंवार सूचना दिल्या आहेत. मात्र, तरीदेखील त्याची अंमलबजावणी होत नसल्याने, या बाबत पुन्हा मुंबईतील शाळांना लेखी सूचना बजावण्यात आल्याचे उपायुक्त महेश पाटील यांनी म्हटले आहे.दादर येथील घटनेने या चिमुकल्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिनींची काळजी घेण्याबाबत पोलिसांकडून पुन्हा लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. शालेय शिक्षकांबरोबर पालकांनीही मुलांची काळजी घेणे, गरजेचे असल्याचे उपायुक्त पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)