Join us

संततीच्या मोहामुळे मुलाचे अपहरण

By admin | Updated: May 17, 2015 23:23 IST

संततीच्या मोहापोटी परिचितांच्या कुटुंबातील लहान मुलाला पळवल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली

नवी मुंबई : संततीच्या मोहापोटी परिचितांच्या कुटुंबातील लहान मुलाला पळवल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तिचा पती मात्र मुलाला घेऊन पसार झाला आहे. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सानपाडा सेक्टर-५ येथे राहणाऱ्या शान विश्वास (४) याचे अपहरण झाले आहे. घराशेजारी खेळताना त्याला पळवून नेण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबीयांच्या परिचयाच्या अभिराम यादव यानेच त्याचे अपहरण केल्याची तक्रार, शानच्या कुटुंबीयांनी तुर्भे पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिराम याची पत्नी पूजा (२८) हिला अटक केली आहे. तिच्या पतीने मात्र पलायन केले आहे. ते दोघेही मूळचे उत्तर प्रदेशचे असून सानपाडा येथे राहतात. दोनही कुटुंब एकमेकांच्या परिचयाची असल्याने शान हा यादव यांच्या घरी खेळायला जायचा. यामुळे त्यांना त्याचा लळा लागला होता. या दोघांनी संततीच्या मोहामुळे लहान मुलाला पळवले असण्याची शक्यता पोलीस उपनिरीक्षक सदानंद सोनकांबळे यांनी व्यक्त केली आहे. परंतु पूजा ही पळवलेल्या मुलाविषयी तसेच पसार पतीविषयी पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. त्यानुसार तुर्भे पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)