Join us  

बडतर्फ नौदल अधिकाऱ्यास पुन्हा नोकरी, सुप्रीम कोर्टाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 2:18 AM

मुंबईत नियुक्तीवर असताना तीन सहकारी अधिका-यांच्या पत्नींना सलग आठवडाभर, वेळी अवेळी अश्लील फोन केल्याच्या आरोपावरून बडतर्फ केलेले नौदल अधिकारी कमांडर रवींद्र व्ही. देसाई यांना दोन आठवड्यांत पुन्हा नोकरीत रुजू करून घेतले जावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.

मुंबई : मुंबईत नियुक्तीवर असताना तीन सहकारी अधिका-यांच्या पत्नींना सलग आठवडाभर, वेळी अवेळी अश्लील फोन केल्याच्या आरोपावरून बडतर्फ केलेले नौदल अधिकारी कमांडर रवींद्र व्ही. देसाई यांना दोन आठवड्यांत पुन्हा नोकरीत रुजू करून घेतले जावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.कमांडर देसाई यांना २६ जानेवारी २०१३ रोजी बडतर्फ केले गेले होते. सैन्यदल न्यायाधिकरणाने ही शिक्षा गुन्ह्याच्या प्रमाणात अधिक कडक असल्याचे म्हणून ती रद्द केली व त्याऐवजी २४ महिन्यांची सेवाज्येष्ठता कपात करण्याची शिक्षा दिली. केंद्र सरकार व कमांडर देसाई या दोघांनीही याविरुद्ध अपिले केली होती. त्यावर न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने वरील आदेश दिला.कमांडर देसाई यांच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचा कोर्ट मार्शलचा व सैन्यदल न्यायाधिकरणाचा निष्कर्ष खंडपीठाने कायम ठेवला. मात्र आम्हीच दिलेल्या स्थगितीमुळे देसाई गेली पाच वर्षे पगाराविना नोकरीबाहेर आहेत. या जोडीला दोन वर्षांची सेवाज्येष्ठता कपात एवढी शिक्षा पुरेशी आहे, असे म्हणून न्यायालयाने देसाई यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचा आदेश दिला. मात्र बडतर्फीपासून पुन्हा रुजू होईपर्यंतच्या काळाचा पगार त्यांना मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.मुंबईत कुलाब्याला नौदल अधिका-यांच्या निवासी संकुलात प्रत्येक अधिकाºयाच्या घरी असलेल्या लॅण्डलाईन टेलिफोनचे संचालन ‘नोफ्रा’ या नौदलाच्या स्वत:च्या टेलिफोन एक्स्चेंजव्दारे केले जाते. या एक्स्चेंजमधून अधिकाºयांच्या घरी टेलिफोनचे एक्स्टेंशन नंबर दिलेले आहेत. कमांडर देसाई यांनी २१ जून ते १ जुलै २०११ दरम्यान रीना चंदेल, आदिती भरतवाल व पल्लवी तिवारी या सहकारी अधिकाºयांच्या पत्नींना त्यांच्या घरातील एक्सटेंशन फोनवर अनेक अश्लील टेलिफोन केले होते.या तिन्ही पत्नींनी हा प्रकार आपापल्या पतींना सांगितल्यानंतर तपास सुरु झाला. ‘नोफ्रा’ एक्स्चेंजमध्ये हे फोन ९५६४७८४७८२ या मोबाईलवरून आल्याची नोंद झाली होती. पोलिसांची मदत घेतल्यावर हा मोबाईल नंबर कमांडर देसाई यांचा असल्याचे स्पष्ट झाले. व्होडाफोन कंपनीकडून ‘कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) मागविल्यावर हे फोन देसाई यांनीच या मोबाईलवरून केल्याचे सिद्ध झाले.लंगडा बचाव अमान्य- संबंधित मोबाईल नंबर देसाई यांच्याकडेच होता, फोन त्याच नंबरवरून केले गेले व फोन अश्लील भाषेत केले गेले या तिन्ही बाबी पुराव्यानिशी सिद्ध झाल्या. देसाई यांनी घेतलेला लंगडा बचाव सबळ पुराव्यांच्या अमान्य झाला.आधी अंदमानमध्ये पोर्ट ब्लेअर येथे नियुक्तीवर असताना तेथे आपण स्वत:साठी व पत्नीसाठी व्होडाफोनची दोन मोबाईल सिमकार्ड घेतली होती. परंतु मुंबईत आल्यावर आपण व पत्नीने आयडियाची सिमकार्ड घेतली व व्होडाफोनची सिमकार्ड काढून टाकली.पुढे ही दोन्ही सिमकार्ड गहाळ झाली व तशा फिर्यादीही आपण ही कथित घटना घडण्याच्या आधीच पोलिसांत नोंदविल्या होत्या, असे देसाई यांचे म्हणणे होते. परंतु संबंधित नंबरचा मोबाईल संदर्भित दिवसांत देसाई यांच्याकडेच होता व त्यावरून नौदल वसाहतीमधूनच हे फोन केले गेले, हे ‘सीडीआर’वरून निर्विवाद सिद्ध झाले.

टॅग्स :महाराष्ट्र