सांगली : राज्यातील २५ महापालिकांत एलबीटी व जकात दोन्ही कर कायम ठेवून मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र संपविण्याचा विडा उचलला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा देत येत्या १९ रोजी मुंबईत होणाऱ्या फॅमच्या राज्यव्यापी मेळाव्यात भूमिका जाहीर करू, असे एलबीटीविरोधी कृती समितीने आज पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. कृती समितीचे समीर शहा, विराज कोकणे, मुकेश चावला, सुदर्शन माने, आप्पा कोरे आदी सदस्यांनी व्यापाऱ्यांची भूमिका मांडली. ते म्हणाले की, व्यापाऱ्यांनी जकात रद्दसाठी लढा दिला. जकात रद्द झाल्यानंतर एलबीटी लागू केला गेला. त्यालाही व्यापाऱ्यांचा विरोध आहे आणि यापुढेही कायम राहील. लोकसभा निवडणुकीत व्यापाऱ्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्र्यांकडून दिलासा मिळेल, अशी आशा होती; पण त्यांनी व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यातच जकातीचा पर्याय पुन्हा खुला करून राज्याला बॅकफूटवर नेले आहे. व्यापाऱ्यांच्यादृष्टीने हा काळा दिवस असून, महाराष्ट्र संपविण्याचाच विडा मुख्यमंत्र्यांनी उचलला आहे, अशी टीकाही केली. शासनाच्या नव्या भूमिकेमुळे महापालिकेचे सॅण्डविच झाले आहे. आम्ही एलबीटी भरणार नाही आणि जकात स्वीकारणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांची संघर्ष करण्याची तयारी आहे. येत्या १९ रोजी मुंबईत फॅमची बैठक होत आहे. या बैठकीत विधानसभेसाठी भूमिकाही जाहीर केली जाईल, असा इशाराही दिला. सांगली महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने आतापर्यंत व्यापाऱ्यांना चांगले सहकार्य केले आहे. एलबीटी वसुलीबाबत कारवाई केलेली नाही. जोपर्यंत हा विषय संपत नाही, तोपर्यंत प्रशासनाने व्यापाऱ्यांवर कारवाई करू नये, अन्यथा आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही दिला. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांनी शब्द पाळावाराज्य शासनाने एलबीटीबाबत निर्णय न घेतल्यास व्यापारी कर भरतील, असा शब्द कृती समितीने आयुक्त अजिज कारचे यांना दिला होता. एलबीटीबाबत अनेक बैठकांत व्यापाऱ्यांनी ही भूमिका कायम ठेवली होती. आता सांगलीतील व्यापाऱ्यांनी दिलेला शब्द पाळावा, अशी प्रतिक्रिया महापालिका प्रशासनाने दिली.
महाराष्ट्र संपविण्याचा मुख्यमंत्र्यांचा विडा
By admin | Updated: August 15, 2014 00:27 IST