Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘आरे’तील कारशेडला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

By admin | Updated: March 26, 2015 02:08 IST

आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो-३च्या कारशेडचे काम स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

मुंबई : आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो-३च्या कारशेडचे काम स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. हा कारशेड अन्यत्र हलविण्याबाबत पर्यायांचा तपास करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रस्तावित कारशेडसाठी आरे कॉलनीतील २ हजार २०० झाडे तोडण्यात येणार आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे प्रकाश बिनसाळे, हेमंत टकले, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री म्हणाले, की कार डेपोसाठी आरे कॉलनीतील २,२९८ झाडांपैकी २ हजार ४४ झाडांचे पुनर्रोपण, तर २५४ झाडांची कत्तल करावी लागणार आहे. त्याच परिसरात झाडांचे पुनर्राेपण केल्यास झाडे जगण्याचे प्रमाण ९० टक्के असते. त्यामुळे झाडांचे त्याच भागात पुनर्रोपण करण्यात येणार आहे. कायमस्वरूपी कत्तल करण्यात येणाऱ्या झाडांच्या बदल्यात ८०० झाडे लावण्यात येणार आहेत. या सर्व कामांसाठी एका तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती झाडांची निगा राखण्याबाबत अभ्यासपूर्ण अहवाल राज्य शासनाकडे सादर करणार आहे. मेट्रोचा मार्ग व डेपोसाठी आवश्यक असलेल्या जागेचा विचार करण्याचे आदेश समितीला दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)