Join us  

मुख्यमंत्री स्वतः दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 8:10 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळग्रस्त भागात जाऊन स्वतः पाहणी करणार आहेत.

मुंबईः गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांत दुष्काळ पडलाय. दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळग्रस्त भागात जाऊन स्वतः पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री दुष्काळाच्या प्रकरणात स्वतः जातीनं लक्ष घालणार असून, दर आठवड्याला दुष्काळग्रस्त परिसराची पाहणी करणार आहेत. विशेष म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त भागातल्या गावागावात जाऊन मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. त्यामुळे शेतक-यांसाठी ही काहीशी दिलासादायक बाब ठरू शकते.सद्यस्थिती मात्र भीषण दुष्काळाकडे वाटचाल करणारी आहे. मराठवाड्यात 70 टक्के व त्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. सरासरी इतका पाऊस पडल्यानंतरही उन्हाळ्यात टंचाईचे चटके बसतात. यंदा तर सरासरीही गाठली नाही. या दुष्काळाची तुलना अनेक जण 1972च्या दुष्काळपेक्षाही भयंकर दुष्काळ अशी करीत आहेत. ऑक्टोबर महिन्यातच विहिरींनी तळ गाठला आहे. भूगर्भपातळीत घट झाली आहे. प्रकल्प कोरडेठाक पडली आहेत. एकीकडे शेतक-यांच्या मदतीचा प्रश्न तर दुसरीकडे पेयजलाचे संकट उभारले आहे.माणसे कुठूनही पाणी आणून पितील परंतु आमच्या जनावरांचे काय होणार? हा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. जिथे टॅँकरचे पाणी माणसांनाच पुरत नाही, तिथे घरातील चार जनावरे कशी जगवायची, हा शेतक-यांसमोरील प्रश्न आहे. मराठवाड्यातील सोयाबीन करपले. कपाशी भुईसपाट झाल्या. मका वाळला आहे. जिथे ऊसक्षेत्र आहे तेथील जलसाठ्यांनीही तळ गाठला आहे. परिणामी, मराठवाड्यातील शेतीव्यवस्था मोठ्या संकटात आहे. अशा वेळी सरकारची भूमिका यापूर्वीच्या सरकारने काय केले, याचा हिशेब सांगणारी नको, तर तत्काळ मदत करणारी हवी आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस