Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:06 IST

राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणारमुख्यमंत्री ठाकरे : रणजीतसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांना सोबत घेणारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ...

राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार

मुख्यमंत्री ठाकरे : रणजीतसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांना सोबत घेणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजीतसिंह डिसले यांना मिळाला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. डिसले यांच्यासारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबविणाऱ्या राज्यातील शिक्षकांना सोबत घेऊन शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत अव्वल दर्जाचे शिक्षण पोहोचविण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते आज युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळालेल्या रणजीतसिंह डिसले यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, डिसले यांनी शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामाने हा पुरस्कार मिळविला आहे. पुरस्काराची रक्कम या स्पर्धेतील इतर नऊ स्पर्धकांमध्ये वाटून दिली आहे. त्यांनी केलेले कार्य हे ध्येयवेडाचे उदाहरण आहे. कोविडनंतर शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत.

मुंबई महानगर पालिकेतील शाळांमधून व्हर्च्युअल क्लासरूम ही संकल्पना राबविली गेली होती, याच धर्तीवर कोविडनंतरचे शिक्षण राज्यातील शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी डिसले यांच्यासारखे तंत्रज्ञानस्नेही आणि नावीन्यपूर्ण विचार करणाऱ्या शिक्षकांची मदत घेऊन शिक्षण विभागाने काम करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुचविले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांनीही डिसले सरांचे कौतुक केले. या सत्कार उत्तर देताना, जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधून जास्तीतजास्त तंत्रस्नेही व सृजनशील शिक्षक निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार, अशी भावना रणजीतसिंह डिसले यांनी व्यक्त केली.