Join us  

मुख्यमंत्र्यांमुळे वाडिया रुग्णालयाला मिळाली १३ कोटी रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 4:03 AM

बाल रुग्णासाठी अत्याधुनिक सुविधा असलेले अशा प्रकारचे हे एकमेव रुग्णालय असल्याने, या रुग्णालयाला पालिकेने टॉनिक दिले आहे.

मुंबई : खास लहान मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या परळ येथील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाला अखेर १३ कोटी रुपये अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापौर दालनात शुक्रवारी घेण्यात आला. हे रुग्णालय बंद करण्याचा डाव फसला आहे. बाल रुग्णासाठी अत्याधुनिक सुविधा असलेले अशा प्रकारचे हे एकमेव रुग्णालय असल्याने, या रुग्णालयाला पालिकेने टॉनिक दिले आहे.बाई जेरबाई वाडिया मुलांचे रुग्णालय आणि नौरोसजी वाडिया प्रसूतिगृह चालविण्यासाठी १९२० मध्ये महापालिकेबरोबर करार झाला. त्यानुसार, गिरणी कामगारांच्या कुटुंबीयांवर मोफत उपचाराकरिता ६१ टक्के खाटा राखून ठेवण्याची अट घालण्यात आली. मात्र, आता गिरणी कामगार नसल्याने गरीब रुग्णांसाठी खाटा राखून ठेवण्याची अट पालिकेने घातली आहे. मात्र, हे रुग्णालय बंद करण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी केला होता.याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापौर दालनात शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत आयुक्त प्रवीण परदेशी, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेता विशाखा राऊत आदी उपस्थित होते. वाडिया रुग्णालयामुळे गरीब रुग्णांना दिलासा मिळत असल्याने, या रुग्णालयाला आर्थिक मदत करण्यावर सर्वांचे एकमत झाले. रुग्णालयाला ९५ कोटी रुपयांची गरज आहे, टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.या रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर चार नगरसेवक सदस्यपदी आहेत. त्यांना बदलून प्रशासकीय अधिकाऱ्यांना घुसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप नगरसेवकांकडून होत आहे.- बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात ३०७ खाटा असून, त्याचा ७५ टक्के खर्च आणि प्रसूतिगृहातील ३०५ खाटांसाठी ५० टक्के अनुदान महापालिका देते.- रुग्णालयात दामदुप्पट फी रुग्णांना आकारली जाते. महापालिकेकडून आलेल्या रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. त्यामुळे अटी व शर्थी पूर्ण करीत नाहीत, तोपर्यंत पालिकेने अनुदान देऊ नये, अशी सूचना नगरसेवकांनी केली होती.- रुग्णालयात दीडशेहून अधिक छोट्या बाळांसाठी आवश्यक अतिदक्षता विभाग आहे. त्यामुळे तात्पुरते अनुदान देऊन नंतर महापालिकेने हे रुग्णालय स्वत: चालविण्यास घ्यावे, असा आग्रह नगरसेवकांनी धरला आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरे