Join us  

मुख्यमंत्री साहेब एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 6:39 PM

अधिकाऱ्यांचा पगार झाला, कर्मचारी पगाराची वाट बघत राहिले...

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : एसटी  महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होते. मात्र एप्रिल महिन्यात चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. मात्र एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांचे वेतन झाले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना डावलले जात आहे, अशी भूमिका कर्मचाऱ्याकडून व्यक्त होत आहे.  प्रत्येक कर्मचारी पगाराची वाट बघून राहिला होता. मात्र  ७ एप्रिलची सायंकाळ झाली तरी त्यांचा पगार न झाल्याने त्याची नाराजी झाली. घर खर्च,वैद्यकीय  खर्च,असे सर्व खर्च कसे करणार असा, प्रश्न कर्मचाऱ्यांने पडला आहे. दरम्यान एसटी कामगार संघंटनांनी  मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री  यांना निवेदने  पाठवून वेतन देण्याची मागणी केली आहे.

यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे. हे आर्थिक गणित जुळविण्यासाठी, एसटीच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात ७५ टक्के आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्यांना पूर्ण पगार  देण्यात येणार होता. त्यामुळे यंदा राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी २५० कोटी रुपये खर्चऐवजी सुमारे २२० कोटी खर्च येणे अपेक्षित आहे. मात्र एसटी  महामंडळाकडे सुमारे १०० कोटींचा निधी उपलब्ध आहे. याशिवाय खासगी शिवशाही बिले, पुरवठादारांची देणीबाकी आहेत. 

एसटीमध्ये दिल्या जात असलेल्या सवलतीचे 300 कोटी रूपये राज्य शासनाकडे शिल्लक आहे. मात्र, वेतनाच्या तारखेवर हा निधी न मिळाल्याने, वेतन देणे शक्य झाले नाही. एसटी कामगारांचे वेतन सुमारे दोन दिवसात होणार असल्याचे एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, 251 पैकी काही आगारातील वेतन करण्यात आले आहे. 30 विभागीय कार्यालयापैकी ठाणे विभागीय कार्यालयाचे वेतन अदा करण्यात आलेले आहे.

---------------------------------

एसटीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याना वेतन मिळाले आहे.  ज्या चालक , वाहक, यांत्रिकी व अन्य कर्मचारी यांच्या पायावर एस टी उभी आहे. त्यांना वेतन मिळालेले नाही.  हा भेदभाव असून वेतन मिळण्यास विलंब होण्यास कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

भाई जगताप , अध्यक्ष , महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस

---------------------------------

एस टी प्रशासनाने  वेतन देण्यासंबंधीचे पत्रक प्रसारित केल्यानंतर त्यास लागणा-या आर्थिक रकमेचे नियोजन आगाऊ करणे आवश्यक होते. मात्र तसे केल्याचे दिसून येत नाही. खरेतर एस टी कर्मचारी या ही परिस्थितीत व अपू-या संरक्षण साधन सामुग्रीत मुंबईमध्ये सेवा देत आहेत. कोणीही कर्मचारी वेतनाशिवाय वंचित राहणार नाही,असे राज्यसरकारने जाहीर करूनही आज ७ तारखेला वेतन होणे आवश्यक होते.परंतू तसे झाले नाही.त्यामुळे कर्मचा-यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.याबाबत  मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री,परिवहन मंत्री , परिवहन राज्यमंत्री यांना पत्र दिले आहे. तातडीने वेतन दिले जाणे आवश्यक आहे.

-  संदीप शिंदे,अध्यक्ष,  महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना 

---------------------------------

कोरोना माहामारीत एसटी कर्मचारी स्वतहा चा जिव धोक्यात घालून राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहे. अशा प्रसंगात कर्मचाऱ्यांना वेतन अदा न होणे, अत्यंत असंवेदनशिल बाब आहे.त्यामूळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन शासनाने अदा करण्याकरीता आर्थिक मदतीसह 258 कोटीचा परतावा द्यावा व तात्काळ वेतन अदा करावे

- जयप्रकाश छाजेडअध्यक्ष , महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या