Join us

मागाठाणेच्या १२० फूटी रस्त्याच्या रुंदीकरणात येथील 340 बाधित घरांना मुख्यमंत्र्यांनी दिला न्याय; आमदार प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांना मिळाले यश

By मनोहर कुंभेजकर | Updated: March 14, 2024 13:58 IST

भविष्यात गोरेगाव मुलुंड लिंक रोड ला जोडल्यावर कांदिवली ते मुलुंड हे अंतर 25-30 मिनिटांत पार करता येईल आणि येथील वाहतूक कोंडी कमी होईल.

मुंबई-पालिकेने गोरेगाव पूर्व ते कांदिवली पूर्व लोखंडवाला रस्त्याच्या कामाला झाली सुरवात केली आहे.भविष्यात हा रस्ता तयार झाल्यावर हे अंतर 10 मिनिटांत पार करता येईल.विशेष म्हणजे  कांदिवली पूर्व लोखंडवाला ते गोरेगाव पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जोडणारा हा पालिकेचा ‘महत्वाचा प्रकल्प’ आहे.तर हा रस्ता झाल्यावर तो भविष्यात गोरेगाव मुलुंड लिंक रोड ला जोडल्यावर कांदिवली ते मुलुंड हे अंतर 25-30 मिनिटांत पार करता येईल आणि येथील वाहतूक कोंडी कमी होईल.

मात्र या प्रकल्पात मागाठाणे प्रभाग क्र.२६ सिंग इस्टेट कांदिवली पूर्व येथून मागाठाणे ते गोरेगाव हा लोखंडवालामधून जाणारा १२० फुटी डीपी रोड रस्त्याच्या रुंदीकरणामुळे जवळपास 340 घरे  बाधित होणार आहेत. येथील महिंद्र कंपनीची जागासुद्धा हस्तांतरित झाली आहे. त्यामुळे येथील घरांचे इतरत्र कुठेही स्थलांतर होऊ नये आणि रस्त्याचे ही रुंदीकरण व्हावे अशी आग्रही मागणी मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काल केली. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून मागाठाणेच्या १२० फूटी रस्त्याच्या रुंदीकरणात येथील 340 बाधित घरांचे येथेच पुनर्वसन करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

या संदर्भात काल रात्री शासकीय सह्याद्री विश्रामगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याकडे आमदार प्रकाश सुर्वे यांनी महत्वाची  बैठक आयोजित केली होती.सदर बैठकीत  रस्ता रुंदीकरणामुळे 340 घरे  बाधित होणार आहेत. त्याऐवजी रस्त्याची बांधणी महिंद्रा आणि महिंद्रा या कंपनीच्या जागेतून केल्यास रस्त्याचे रुंदीकरण ही होईल आणि येथील नागरिकांचे स्थलांतर होणार नाही असा महत्वाचा निर्णय  झाला अशी माहिती आमदार सुर्वे यांनी दिली.त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.इक्बाल सिंग चहल आणि अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना पुढील प्रक्रिया करण्याचे आदेश दिले.

सदर बैठकीत मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल, राज्याचे मुख्य सचिव भूषण गगराणी,नगर विकास सचिव आसीम गुप्ता, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, राठोड,उपायुक्त डॉ.भाग्यश्री कापसे, आर/दक्षिण विभागाचे सहा.आयुक्त ललित तळेकर, शाखाप्रमुख सचिन केळकर, महिला शाखाप्रमुख  हेमलता नायडू, विधानसभा संघटक बापूराव चव्हाण, सिंग इस्टेट रहिवासी संघाचे पांडुरंग धायगुडे,मारुती हजारे ,योगेश बांद्रे,अरुण देव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :प्रकाश सुर्वे