Join us
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या ठाण्यासाठी मुख्यमंत्री सक्रिय

By admin | Updated: October 25, 2016 03:46 IST

एका खाजगी दुकानाच्या शुभारंभासाठी ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक महापालिका मुख्यालयात जाऊन पालिकेने बदलत्या ठाण्यासाठी

ठाणे : एका खाजगी दुकानाच्या शुभारंभासाठी ठाण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक महापालिका मुख्यालयात जाऊन पालिकेने बदलत्या ठाण्यासाठी स्थापन केलेल्या ठाणे सिटी ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचे उद्घाटन करून ठाण्याच्या बदलत्या चेहऱ्याचे खरे रूप कसे असेल, याची माहिती आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून जाणून घेतली. आयुक्तांनी बंद दाराआड विशेष सादरीकरणाच्या माध्यमातून बदलते ठाणे कसे असेल, हे मुख्यमंत्र्यांना पटवून दिले. मात्र, ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा आयुक्तांची भेट घेतल्याने ठाण्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. महापालिका मुख्यालयाजवळ एका नामांकित कपड्यांच्या दुकानाच्या शोरूमच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ठाण्यात आले होते. दुकानाचा शुभारंभ केल्यानंतर ते अचानक पालिका मुख्यालयाला भेट देणार असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांचीदेखील या वेळी बंदोबस्त फिरवण्यासाठी दमछाक झाली. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ठाणे सिटी ट्रान्सफॉर्मेशन सेंटरची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. या वेळी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या सेंटरच्या माध्यमातून पालिकेने शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी हाती घेतलेल्या १०७ प्रकल्पांचे धावते सादरीकरण केले. यामध्ये डीजी ठाणे, वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, पार्किंग सेंटर, कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून हाती घेतलेले विविध प्रकल्प, वायफाय, सीसीटीव्ही कॅमेरे, सेंट्रल पार्क, आरोग्य सुविधा आदींसह इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा या वेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला. या वेळी त्यांच्यासमवेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, सुभाष भोईर, महापौर संजय मोरे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, एका खाजगी शोरूमच्या शुभारंभाला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अचानक पालिकेला भेट का दिली, हा मात्र आता चर्चेचा विषय ठरला आहे. येत्या काही महिन्यांवर ठाणे महापालिकेच्या निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे या भेटीला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याने आता शिवसेनेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याची भाजपाची ही खेळी तर नाही ना, अशी चर्चादेखील रंगू लागली आहे. मुख्यमंत्री पालिकेत येतात तेव्हा... कर्मचाऱ्यांचे मोबाइल फोटोसाठी आॅनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक पालिकेत आल्याने सर्वांचीच धावपळ सुरू झाली.६ चा ठोका वाजल्याने अनेक कर्मचारी लगबगीने घरी जाण्यास निघाले होते. परंतु, मुख्यमंत्री पालिकेत येताच, पुन्हा त्यांना पाहण्यासाठी तळ मजल्यापासून थेट चौथ्या मजल्यापर्यंत पालिका कर्मचाऱ्यांसह येथे आलेल्या नागरिकांचे मोबाइल बाहेर पडले आणि मुख्यमंत्र्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सर्व जण थांबून पॅसेजमध्ये थांबून होते. मुख्यमंत्री नेमके कशासाठी आले, यामागचे कारण काय, आधी ठरले होते का, ही राजकीय भेट आहे का, अशा अनेक चर्चा या वेळी रंगल्या होत्या. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांच्या घरी जाऊन गणपती दर्शन घेतले होते. थेट महापालिका मुख्यालयात जाऊन एखाद्या प्रकल्पाची माहिती दस्तुरखुद्द जाणून घेण्याचा कदाचित हा राज्यातील पहिलाच प्रकार असल्याचीही चर्चा होती.