Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोटा शकीलच्या हस्तकांना अटक

By admin | Updated: April 21, 2016 04:45 IST

कुख्यात गँगस्टर छोटा शकीलच्या तीन हस्तकांना मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक करून पश्चिम उपनगरातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या हत्येचा कट हाणून पाडला.

मुंबई : कुख्यात गँगस्टर छोटा शकीलच्या तीन हस्तकांना मुंबई पोलिसांनी बुधवारी अटक करून पश्चिम उपनगरातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या हत्येचा कट हाणून पाडला. जोसेफ उर्फ राजू पिल्लाई (वय ४२, रा. जोगेश्वरी प.), संजय गुरव उर्फ भोला (४०, रा.गोरेगाव प.) व नईम खान ( २८, जोगेश्वरी प) अशी त्यांची नावे असून, त्यांच्याकडून दोन पिस्तूल, १२ जिवंत काडतुसे, एक मॅगझिन व अन्य साहित्य जप्त केले. गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, खंडणीविरोधी पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली की, छोटा शकीलचे तिघे साथीदार एका व्यावसायिकाची हत्या करण्यासाठी जोगेश्वरी येथील मीना हॉटेलच्या परिसरात एकत्र जमणार आहेत. त्यानुसार ,वरिष्ठ निरीक्षक विनायक वस्त, निरीक्षक सचिन कदम, संजीव धुमाळ आदींनी सहकाऱ्यांसमवेत परिसरात सापळा रचला. हॉटेलजवळ संशयास्पदरीत्या आढळणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, जोसेफ व भोलाकडे ७.६५ बोअरचे प्रत्येकी एक पिस्तूल व सहा जिवंत काडतुसे आणि नईमकडे पिस्तूल, ब्लेड आणि त्यांच्याकडे एकूण सहा मोबाइल मिळून आले. (प्रतिनिधी)