ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १२ - शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले, राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. भुजबळ शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची बातमी एका वृत्तपत्राने छापली असून यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र भुजबळ यांनी या वृत्ताचा इन्कार केला आहे.
आगामी निवडणुकीनंतर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता दिसत नसल्याने भुजबळ यांनी प्रथम भाजपात जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो सफल न झाल्याने त्यांनी शिवसेनेच्या दिशेने पाऊल टाकल्याचे या बातमीत म्हटले आहे. तसेच यासाठी आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनीही मध्यस्थी बातमीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान या सर्व वृत्ताचा छगन भुजबळ यांनी मात्र इन्कार केल्याचे समजते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणीतरी मुद्दाम अशा अफवा पसरवत असल्याचे सांगत आपला राष्ट्रवादी सोडण्याचा विचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.