Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्राची पुस्तके विद्यार्थ्यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 02:57 IST

१० ऑगस्टपासून विक्रीला; १० हजारांहून विद्यार्थ्यांना होणार फायदा

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यास मंडळाने बीएस्सी प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रासाठी अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके तयार केली आहेत. प्राणीशास्त्र विषयाच्या पाठोपाठ रसायनशास्त्राची अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके तयार करण्याचा हा दुसरा उपक्रम विद्यापीठाने हाती घेतला आहे.कन्साईस ग्रॅज्युएट केमिस्ट्री-१, कन्साईस ग्रॅज्युएट केमिस्ट्री-२ आणि लॅबोरेटरी एक्स्पेरिमेंट इन केमिस्ट्री अशी या पुस्तकांची नावे असून अत्यंत कमी दरात ही पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुंबई विद्यापीठाच्या प्रकाशन विभागामार्फत प्रकाशित करण्यात आलेली ही पुस्तके १० आॅगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आता खासगी प्रकाशनाची पुस्तके वापरावी लागणार नसून विद्यापीठाच्याच प्राचार्यांनी तयार केलेल्या आवश्यक पाठांचा, मजकुराचा अभ्यास करणे सोपे होणार आहे.आजमितीस मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या जवळपास ६०० महाविद्यालयांत रसायनशास्त्र विषय शिकवले जात असून १० हजारांहून अधिक विद्यार्थी या अभ्यासक्रमात प्रविष्ट होत असतात. या अभ्यासक्रमासाठी पदवीच्या प्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र अभ्यास मंडळाने अथक प्रयत्न घेऊन विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाची अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके तयार केली आहेत, ही अभिनंदनीय बाब असून भविष्यात यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणात सुधारणा करून उत्कृष्ट दर्जाची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जावी, असे प्रतिपादन कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी केले. भविष्यकालीन गरजा ओळखून अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल करणे काळाची गरज असून त्या दृष्टीने रसायनशास्त्र अभ्यास मंडळासोबत इतरही अभ्यास मंडळाने मार्गक्रमण करावे, असा मोलाचा सल्ला कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी दिला.प्रत्येक पुस्तकासाठी आयएसबीएन आणि बारकोड पद्धतीचा वापर करण्यात आला असून उत्तम दर्जाची पुस्तके विद्यापीठाने तयार केली असल्याचे रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि सहयोगी अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख यांनी सांगितले.११ लेखकांचा सहभागएकूण ३६ लेखक समूहातून ११ लेखकांनी ही पुस्तके तयार केली आहेत, तर प्रत्येक पुस्तकासाठी १२ प्राध्यापकांनी पुस्तकांचे पुनरावलोकन केले आहे. विशेष बाब म्हणजे या पुस्तकातील सर्व आकृत्या आणि चित्रे लेखकांनी स्वत: तयार केली आहेत. तर उर्कंड सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाङ्मयचौर्य परीक्षण करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ