मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शहरातील पालिकेच्या अनेक मैदानांवर एका मोबाइल कंपनीचे फोर-जी टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. चेंबूर परिसरातदेखील अशाच प्रकारे टॉवर उभारले जात असल्याने येथील टिळकनगर परिसरातील रहिवाशांनी एकत्र येत पालिका आणि मोबाइल कंपनीविरोधात शुक्रवारी जोरदार निदर्शने केली. गेल्या काही वर्षांत शहरातील अनेक मैदाने बिल्डर आणि काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काबीज केली आहेत. त्यामुळे शहरात लहान मुलांसाठी खेळाची मैदाने कमी पडत असतानाच सध्या काही मैदानांवर मोबाईल कंपन्यांनी टॉवर उभारण्याचा घाट घातला आहे. चेंबूरमध्ये देखील अशाच प्रकारे १७ मैदानांवर फोर-जीचे टॉवर उभारण्याचे काम सुरू असून हे टॉवर उभे राहिल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिकेने याचा कोणताही विचारदेखील न करता शहरातील सर्वच पालिका मैदानांवर हे टॉवर उभारण्याची परवानगी दिली आहे. मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे कॅन्सरसारख्या भयानक रोगाची लागण होत असल्याने गेल्या काही वर्षांत अनेक रहिवाशांनी इमारतींवर असलेले मोबाइल टॉवर काढून टाकले. त्यामुळे इमारतींवर टॉवर उभारण्याची परवानगी मिळत नसल्याने या कंपन्यांनी आता शहरातील मैदाने काही राजकीय पक्षांच्या मदतीने काबीज करण्याचा डाव आखल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून चेंबूरमध्ये असलेल्या पालिका मैदानांवरदेखील मोठ्या जोमाने हे टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. ही बाब परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना समजताच त्यांनी टॉॅवरविरोधात पालिकेच्या एम-पश्चिम कार्यालयात धाव घेतली. मात्र या ठिकाणी असलेल्या या अधिकाऱ्यांनादेखील या टॉवरच्या उभारणीबाबत काहीच कल्पना नसल्याचे समोर आले आहे. तसेच चेंबूरच्या टिळकनगर परिसरातील एकमेव पालिका मैदानातदेखील अशाच प्रकारे टॉवर उभारला जात असल्याची माहिती येथील रहिवाशांना मिळताच, त्यांनी या मोबाइल टॉवरला विरोध करण्यासाठी सह्याद्री मैदानावर येऊन पालिका आणि मोबाइल कंपनीविरोधात जोरदार निदर्शने केली. या वेळी परिसरातील वृद्धांसोबतच लहान मुलांची संख्यादेखील लक्षणीय होती. (प्रतिनिधी)
मोबाइल टॉवरविरोधात चेंबूरकर एकवटले
By admin | Updated: February 23, 2015 01:02 IST