Join us  

असह्य वातावरणाचा पेंग्विनला जाच; पक्षितज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 2:34 AM

राणीबागेत पेंग्विनचे फोटो काढण्यास परवानगी नसताना फोटो कसे व्हायरल झाले?

मुंबई : पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर पक्षितज्ज्ञांनी मते व्यक्त केली असून, पेंग्विन हा पक्षी परदेशातील असल्याने त्याला येथील वातावरण असह्य झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पक्षितज्ज्ञांचे म्हणणे आहे. पेंग्विनचे बंदिस्त भागात प्रजनन झाल्याने आणि बंदिस्त वातावरण सहन न झाल्याने पेंग्विनचा मृत्यू झाल्याचेही पक्षितज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, राणीबागेत पेंग्विनचे फोटो काढण्यास परवानगी नसताना बेबी पेंग्विनचे फोटो सोशल मीडियावर कसे व्हायरल झाले, असा सवाल पक्षिमित्रांकडून उपस्थित करण्यात आला आहे.प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीचे सचिव सुनिश कुंजू यांनी सांगितले की, खासगी यंत्रणा सुरू असल्याने बेबी पेंग्विन इतके दिवस जगले. महापालिकेमार्फत जर पेंग्विनची देखभाल केली असती; तर पेंग्विनचा लवकर मृत्यू झाला असतात. परदेशातील पशुपक्षी आपल्या देशात किंवा मुंबईत दिसलेच पाहिजेत याचा अट्टाहास कशासाठी करण्यात येत आहे? राणीबागेत आठ पेंग्विन आणण्याच्या विरोधात पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र यास कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. राणीबागेत पेंग्विनचे फोटो काढण्यास मनाई आहे. मात्र बेबी पेंग्विन जन्माला आले तर त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर कसे व्हायरल झाले? प्रत्येक पशुपक्ष्याला नैसर्गिक वातावरणात राहण्याची सवय असल्याने अनैसर्गिक वातावरणात ठेवल्याने पेंग्विनला मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. कर्मचाऱ्यांनी आता इतर पेंग्विनवर लक्ष देणे आवश्यक आहे.पर्यावरणतज्ज्ञ नितीन वाल्मीकी यांनी सांगितले की, हम्बोल्ट प्रजातीचे पेंग्विन हे पेरू आणि चिली या भागात जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे मुंबईतील वातावरणाचा समतोल राखणे पेंग्विनसाठी अवघड झाले असावे. राणीबागेत ठेवण्यात आलेले खारे पाणी आणि पेरू येथील खाºया पाण्यात फरक आहे. पेंग्विनला योग्य खाद्य पुरविणे महत्त्वाचे आहे. मुंबईत पेंग्विनचे योग्य प्रकारचे खाद्यपदार्थ मिळणे अवघड आहे.नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष कौस्तुभ दरवेस म्हणाले की, कोणत्याही पक्ष्याच्या जन्मापासून सुरुवातीचे ३० दिवस हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. ३० दिवसांच्या आतमधील काळात पक्ष्यांच्या पिल्लाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त आहे. जन्म-मृत्यूच्या घटना नैसर्गिक आहेत. मात्र कॅपटिव्हीटी ब्रीडिंगमुळे (बंदिस्त जागेत प्रजनन) झाल्यामुळे मृत्यूच्या शक्यता जास्त आहेत. यात डॉक्टर किंवा व्यवस्थापनाचा दोष आहे, असे म्हणता येणार नाही. कारण या घटनेला राजकारणाचे पदर आहेत. त्यामुळे येणाºया दिवसांत प्राणिसंग्रहालयाची उपयुक्तता यावर वाद होण्याची शक्यता आहे. निसर्गात इतर अनेक पक्ष्यांचा मृत्यूू होतो. परंतु पेंग्विनकडे जास्त लक्ष असल्याने पेंग्विनच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला जात आहे.रॉ प्राणिमित्र संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले की, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्राणिसंग्रहालयात प्रजनन होण्याची परवानगी नाही. या परवानगी घेण्यात आल्या असतील, तर कोणत्या आधारावर परवानगी घेण्यात आली हे तपासणे आवश्यक आहे. आता सध्या बेबी पेंग्विनच्या पालकांची म्हणजे मोल्ट (नर) आणि फ्लिपर (मादी) यांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांना नैराश्याला सामोरे जावे लागेल त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवली जावी.

टॅग्स :मुंबई