Join us  

बायकोशी गद्दारी, पुण्यात शेण खायला का जाता?; रामदास कदमांचा किर्तीकरांवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 3:40 PM

माझ्यावर गद्दारीचा शिक्का लावण्याचा गजाभाऊंनी प्रयत्न केला त्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो असं कदमांनी म्हटलं.

मुंबई – शिवसेना नेते रामदास कदम आणि खासदार गजानन किर्तीकर यांच्यातील वाद आता टोकाला पोहचला आहे. कदम-किर्तीकर यांच्यातील आरोप प्रत्यारोप आता थेट घरच्या उंबरठ्यापर्यंत पोहचले आहेत. कदमांनी गद्दारीचे आरोप करणे हास्यास्पद असल्याचं सांगत किर्तीकरांनी पत्रक काढले होते. त्यावरून संतापलेल्या रामदास कदमांनी गजानन किर्तीकरांवर बायकोशी गद्दारी करत असल्याचा आरोप केलाय.

रामदास कदम म्हणाले की, तुम्ही माझ्याविरोधात प्रेसनोट काढली, माझ्याबद्दल भरपूर काही बोलून गेला. भाऊ तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. रामदास कदमांनी कधीच गद्दारी केली नाही. उलट तुम्ही तुमच्या पत्नीशी गद्दारी केली आणि शेण खायला पुण्याला जाता हे बोलू का? महाराष्ट्राला सांगू का? हे बोलायला लावू नका. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात. कालपर्यंत मी त्यांचा आदर ठेवला. गुहागरमध्ये अनंत गीतेंनी मला पाडण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना पाडायचा प्रयत्न केला नाही. मी शाखाप्रमुख होतो, तेव्हा केलेल्या कामावर तुम्ही निवडून आलात, आज ३३ वर्षांनी तुम्हाला साक्षात्कार होतो, मी तुम्हाला पाडायचा प्रयत्न केला बोलतायेत असं त्यांनी सांगितले.

तसेच माझ्यावर गद्दारीचा शिक्का लावण्याचा गजाभाऊंनी प्रयत्न केला त्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो. सुधीर भाऊंच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला, तुम्ही गद्दारी आणि बेईमानी केलीत. हे मला बोलायचे नव्हते. गद्दारी तुमच्या नसनसात आहे. तुमचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुमचे पित्त खवळलं. त्यानंतर तुम्ही इतर नेत्यांवर गद्दारीचा शिक्का मारून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. महाराष्ट्र उघड्या डोळ्याने लोक पाहतायेत. प्रेसनोट काढण्याआधी तुम्ही मुख्यमंत्री शिंदेंना जाऊन भेटला असता तर हा तमाशा लोकांना दिसला नसता. हे फटाके फुटले नसते. आपण झक मारायची शेण खायचे आणि नंतर नेत्यांना भेटायचे असा आरोप कदमांनी केला. 

त्याशिवाय गजाभाऊ तुम्ही खरे काय आहात, तुमचे वस्त्रहरण करेन, माझ्या नादाला लागू नका. महिलासुद्धा तुम्हाला मते देणार नाहीत. आम्ही कडवट शिवसैनिक आहे. गद्दारी, बेईमानी आमच्या रक्तात नाही. पुण्याला काय गडबड आहे ती गजाभाऊंना कळाले असेल. गजाभाऊ राजकारण करतायेत. महिलांसमोर मते मागायला जाऊ शकतात का?, या वयात काय चाळे चाललेत हे सांगावे लागेल. मला उत्तर दिले पाहिजे असा इशाराही रामदास कदमांनी गजानन किर्तीकरांना दिला.

दरम्यान, एकाच पक्षातील २ नेत्यांमध्ये फटाके फुटतायेत, ते निश्चितपणे शोभनीय नाही. गजानन किर्तीकर यांनी वय झाल्यानं निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं. परंतु जेव्हा उद्धव ठाकरेंनी अमोल किर्तीकरांना उमेदवारी दिली तेव्हा तुम्ही लगेच जवान कसे झालात? निवडणूक लढवायला तयार कसे झालात? मग एकनाथ शिंदे यांच्याकडून तिकीट घेऊन घरी बसायचे आणि मुलाला निवडून द्यायचे असे काही नाही ना? इतका तातडीने बदल का झाला त्यासाठी अविश्वास दाखवणे नाईलाज होता. कारण तुम्ही आणि तुमचा चिरंजीव एकाच ऑफिसमध्ये बसून काम करता, तुमचा फंड तो वापरतो. मग बाप-बेटा एकमेकांसमोर उभं राहण्याचं नाटक का करताय एवढाच माझा विषय होता असंही कदमांनी स्पष्टपणे सांगितले.

टॅग्स :शिवसेनारामदास कदमगजानन कीर्तीकर