Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुबईवारीच्या नावाखाली फसवणूक

By admin | Updated: February 3, 2015 01:45 IST

दुबईवारीच्या नावाखाली तीन मैत्रिणींंची फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलुंड : दुबईवारीच्या नावाखाली तीन मैत्रिणींंची फसवणूक केल्याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल शर्मा आणि अमित त्रिपाठीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.मुलुंड पश्चिमेकडे राहणाऱ्या नीलू सचदे या महिलेस आॅक्टोबर महिन्यात शर्मा आणि त्रिपाठी यांनी पहिला कॉल केला. नोएडा येथील हॉलिडे एक्स्पर्ट येथून बोलत असल्याचे सांगून अवघ्या ५० ते २५ हजारांमध्ये दुबईच्या टूर पॅकेजचे आमिष दाखवण्यात आले. सचदे यांनाही जानेवारी महिन्यात दुबईला जायचे होते. शिवाय आरोपीने दुबई टूरसाठी आणखीण सदस्य गोळा केले असता, पॅकेजमध्ये सूट देत गोवा पॅकेज फ्रीमध्ये देण्यात येईल, असेही सांगितले. यावरून सचदे यांनी त्यांची मैत्रीण पौर्णिमा मेस्त्री आणि सुजाता चंदराना यांना ही माहिती दिली. आरोपींंच्या कमी पैशांत दुबईवारीच्या आमिषाला तिघीही मैत्रिणी भुलल्या. ५ जानेवारीला ही टूर सुरू होणार होती. आॅक्टोबरपासून शर्मा आणि त्रिपाठी तिघींंशी मेल आणि मोबाइलद्वारे संपर्कात होते. दोघांवर विश्वास ठेवत तिघा मैत्रिणींनी आरोपींंच्या खात्यामध्ये आॅनलाइन पैसेही जमा केले. पैसे भरूनही टूरच्या वेळापत्रकात होत असलेली चालढकल लक्षात येताच तिघींनी पैसे परत देण्याचा तगादा लावला. मात्र आरोपींनी मोबाइल बंद केले. आरोपींंशी तुटलेल्या संपर्कामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिघींनीही पोलीस ठाणे गाठून शुक्रवारी तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)या प्रकरणी त्रिपाठी आणि शर्माविरोधात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली.