नवी मुंबई : चट मंगनी पट ब्याह करून घटस्फोटित महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार खारघर येथे घडला आहे. शादी डॉट कॉमच्या माध्यमातून महिलेसोबत परिचय वाढवून हा प्रकार घडला आहे. मात्र या लग्नानंतर नवऱ्याने नवरीच्या दागिन्यांसह पळ काढला आहे.फहिम खान असे फरार नवऱ्याचे नाव आहे. खारघर येथे राहणाऱ्या फहिम याने शादी डॉट कॉम या साइटवर लग्नासाठी स्वत:ची माहिती टाकली होती. त्याद्वारे याच साइटवरील ३१ वर्षीय घटस्फोटित महिलेसोबत त्याने ओळख वाढवली. त्याने या महिलेकडे लग्नाची मागणी घातली असता तिनेही लग्नाला होकार दिला होता. त्यानुसार ८ डिसेंबर रोजी या दोघांनी फोनवरूनच निकाह केला. लग्नानंतर फहिमने तीला खारघरला बोलावले होते. त्यानुसार स्वत:कडील दागिने व ८ वर्षांच्या मुलासह ही नवरी खारघर येथे आली होती. काही दिवसांपूर्वी ते पाचगणी येथे फिरायलादेखील गेले. १३ डिसेंबर रोजी फहिम सदर महिलेला तिच्या मुलासोबत खारघर येथील मॉलमध्ये फिरायला घेऊन गेला. या वेळी सदर महिलेने तिच्याकडील सुमारे ६ लाख ३६ हजार रुपये किमतीचे दागिने त्याच्या कारमध्ये ठेवले होते. ही महिला मुलासोबत मॉलमध्ये खेळत असताना मित्राला भेटून येतो, असे सांगून फहिम तेथून निघून गेला. बराच वेळानंतरही तो परत आला नाही. त्याचा शोधाशोध करण्यात आला मात्र तो निसटून गेला. या वेळी त्याची कारही तेथे नसल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानुसार फहिम याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात त्याच्या दोन साथीदारांचाही सहभाग आहे.या दोनही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
घटस्फोटित महिलेसोबत लग्न करून फसवणूक
By admin | Updated: December 18, 2014 00:50 IST